Breaking
Updated: जून 26, 2026
भूगर्भातील जलपातळी खालावली, पावसाळ्यात बोअरचे पुनर्भरण आवश्यक
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई (प्रतिनिधी)
यावर्षी तीव्र उन्हाळा जाणवला. अगदी जून महिन्यात ही प्रचंड उन्हाच्या झळा सहन कराव्या लागल्या, त्यातच अल निनो चे संकट गडद झाल्यामुळे पावसाने मोठी ओढ दिली आहे. वाढत्या उन्हामुळे धनेगाव येथील मांजरा प्रकल्प व काळवटी साठवण तलाव प्रकल्पातील पाण्याचे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन झाले. त्यामुळे पाणी साठा कमी झाला आहे. जून महिन्यांत तब्बल २४ दिवस कोरडे गेले त्याचा परिणाम असा झाला की, भूगर्भातील जलपातळी खालावली असून त्यासाठी अंबाजोगाई नगरपरिषदेकडून जनजागृतीची गरज आहे. कारण, भूगर्भातील जलपातळी वाढविण्यासाठी पावसाळ्यात बोअरचे पुनर्भरण आवश्यक आहे. त्यामुळे रेन वॉटर हार्वेस्टिंग करणाऱ्या नागरिकांना प्रोत्साहन म्हणून अंबाजोगाई नगरपरिषदेने मालमत्ता करात १० टक्के सूट द्यावी अशी मागणी लोक विकास आघाडीचे प्रमुख राजकिशोर मोदी यांनी केली आहे.
या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात लोक विकास आघाडीचे प्रमुख राजकिशोर मोदी यांनी सांगितले की, आम्ही नगरपरिषदेत सत्तेत असताना पावसाचे पाणी जमिनीत मुरावे व बोअरचे पुनर्भरण होण्यासाठी त्यावेळी अंबाजोगाई नगरपरिषदेने रेन वॉटर हार्वेस्टिंग करणाऱ्या नागरिकांना मालमत्ता करात सूट देण्याचा निर्णय घेतला व राबविला. ज्या-ज्या नागरिकांनी आपल्या घरी पावसाचे पाणी वाया न घालवता ते जमिनीमध्ये मुरवले किंवा एका टाकीत साठवले, रूफटॉप हार्वेस्टिंग (छतावरील पाणी जमिनीत सोडणे) करून रेन वॉटर हार्वेस्टिंग केले. व त्या नंतर नगरपरिषदेकडे रितसर अर्ज करून त्याची माहिती दिली. आणि त्यांच्या मालमत्ता करात सूट मिळावी अशी मागणी केली त्या अर्जदारांना आम्ही नगरपरिषदेत सत्तेत असताना सुट दिली होती. असे असताना आज ही अनेक नागरिकांनी रेन वॉटर हार्वेस्टिंगकडे दुर्लक्ष केले आहे. पर्यावरण संवर्धन आणि जमिनीतील पाणी पातळी वाढावी म्हणून रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे आज काळाची गरज आहे. राज्यातील अनेक महानगरपालिका आणि नगरपालिका पर्यावरणपूरक उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी ही सूट देतात. रेन वॉटर हार्वेस्टिंगद्वारे मालमत्ता कर सवलत मिळविण्याची प्रक्रिया अंबाजोगाई नगरपरिषदेने पुन्हा एकदा राबवावी असे वाटते. यासाठी एक स्वतंत्र कक्ष स्थापन करावा. त्याद्वारे यंत्रणा राबवावी. वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात निर्माण होणारी पाणीटंचाई दूर करण्यासाठी आणि भूजल पातळी वाढवण्यासाठी अंबाजोगाई नगरपरिषदेच्या वतीने शहरातील नागरिकांना आपल्या घरावर ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ यंत्रणा उभारून पावसाचे पाणी जमिनीत जिरवावे, असे आवाहन करावे. विशेष म्हणजे, पर्यावरणपूरक अशा या उपक्रमाला प्रतिसाद देणाऱ्या सजग नागरिकांना मालमत्ता करात थेट १० टक्क्यांपर्यंत सवलत देण्याचा निर्णय प्रशासनाने घ्यावा. यामुळे पाणी बचतीसोबतच नागरिकांच्या पैशांचीही बचत होईल. अंबाजोगाई शहरात दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणवते. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. जर नागरिकांनी आपापल्या घराच्या, इमारतीच्या किंवा सोसायटीच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी वाया न घालवता ते पाईपद्वारे जमिनीत किंवा विहिरीत/बोरवेलमध्ये सोडले, तर शहरातील भूजल पातळीत मोठी वाढ होईल. यामुळे नागरिकांना स्वतःच्या विहिरीला किंवा बोरवेलला उन्हाळ्यातही भरपूर पाणी उपलब्ध राहील. या जलसंधारणाच्या कामाला प्रोत्साहन म्हणून नगरपरिषदेने कर सवलतीची योजना पुन्हा सुरू करणे गरजेचे आहे. अंबाजोगाईतील नागरिक शहराला कायमस्वरूपी पाणीटंचाईमुक्त करण्यासाठी आणि आपल्या घरच्या करात बचत करण्यासाठी आजच आपल्या घरी रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा बसवतील आणि एक जबाबदार नागरिक म्हणून योगदान देतील, असा आम्हाला विश्वास आहे. परंतु, यासाठी अंबाजोगाई नगरपरिषदेकडून पुढाकार घेऊन या उपक्रमाला प्रतिसाद देणाऱ्या सजग नागरिकांना मालमत्ता करात थेट १० टक्क्यांपर्यंत सवलत देण्याचा निर्णय प्रशासनाने जाहीर करावा अशी मागणी लोक विकास आघाडीचे प्रमुख राजकिशोर मोदी यांनी केली आहे.