Breaking
Updated: डिसेंबर 24, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई: महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे अधिकृत डीलर असलेल्या कॉर्नर स्टोन ऑटोमोबाईल्समध्ये सेल्स मॅनेजरने कंपनीच्या रकमेचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने ग्राहकांकडून आलेली बुकिंग आणि विक्रीची रक्कम बँकेत जमा न करता स्वतःसाठी वापरून तब्बल ११ लाख ९६ हजार ५८ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी सुनील भगवानराव डिडोरे (वय ४५, रा. सावेडी, अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे. डिडोरे हे कॉर्नर स्टोन ऑटोमोबाईल्समध्ये जनरल मॅनेजर असून त्यांच्याकडे बीड जिल्ह्याचाही कार्यभार आहे. त्यांच्या कंपनीची अंबाजोगाई येथील केज रोडवर शाखा असून तिथे २०१८ पासून प्रकाश विठ्ठलराव पवार (रा. बार्शी रोड, बीड) हा सेल्स मॅनेजर म्हणून कार्यरत होता. आरोपीकडे वाहनांच्या विक्रीची आणि बुकिंगची रक्कम ग्राहकांकडून घेऊन ती मुख्य शाखेच्या बँक खात्यात भरण्याची जबाबदारी होती.
सप्टेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत पवार याने ग्राहकांकडून रोख स्वरूपात मिळालेली रक्कम बँकेत वेळेवर जमा न करता स्वतःच्या फायद्यासाठी वापरली. मुख्य शाखेने केलेल्या कॅश ऑडिटमध्ये ही तफावत आढळली. एकूण १४ लाख ५८ हजार ४८४ रुपयांच्या तफावतीपैकी काही रक्कम त्याने कपात आणि रोख स्वरूपात परत केली, मात्र उर्वरित ११ लाख ९६ हजार ५८ रुपयांचा त्याने अपहार केला. वारंवार विचारणा करूनही रक्कम न भरल्याने अखेर पोलिसांत धाव घेण्यात आली. अंबाजोगाई शहर पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ४०८ अन्वये गुन्हा नोंदवला असून पोलीस उपनिरीक्षक प्रदीप भानुदास गोंद पुढील तपास करत आहेत.