Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

अंबाजोगाई येथे एच.आय.व्ही./एड्स जनजागृतीसाठी फ्लॅश मॉब कार्यक्रम

Updated: डिसेंबर 23, 2025

By Vivek Sindhu

अंबाजोगाई येथे एच.आय.व्ही./एड्स जनजागृतीसाठी फ्लॅश मॉब कार्यक्रम संपन्न

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई – महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई ,जिल्हा रुग्णालय बीड , जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष बीड आणि मानवलोक समाजकार्य महाविद्यालय, अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने अंबाजोगाई शहरातील विविध सार्वजनिक ठिकाणी एच.आय.व्ही./एड्स विषयक जनजागृती करण्याच्या उद्देशाने एक प्रभावी व लक्षवेधी फ्लॅश मॉब कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला. समाजामध्ये एच.आय.व्ही./एड्स संदर्भातील गैरसमज, भीती व सामाजिक कलंक दूर करून योग्य माहिती जनतेपर्यंत पोहोचवणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

आजही एच.आय.व्ही./एड्स या आजाराबाबत समाजात अनेक चुकीच्या समजुती आढळून येतात. या पार्श्वभूमीवर युवकांच्या ऊर्जेचा व सर्जनशीलतेचा उपयोग करून जनजागृती करण्यासाठी फ्लॅश मॉबसारख्या आधुनिक व प्रभावी माध्यमाची निवड करण्यात आली. या कार्यक्रमामध्ये महाविद्यालयातील एम.एस.डब्ल्यू. (समाजकार्य) विभागातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

हा फ्लॅश मॉब कार्यक्रम अंबाजोगाई येथील बसस्थानक परिसर, मुख्य बाजारपेठ, एस आर टी आर महाविद्यालय व रुग्णालय परिसर व इतर वर्दळीच्या सार्वजनिक ठिकाणी आयोजित करण्यात आला. अचानक सुरू झालेल्या नृत्य व अभिनयाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. सुरुवातीला विद्यार्थ्यांनी सामान्य नागरिकांप्रमाणे वावरण्याचा अभिनय केला व अचानक संगीताच्या तालावर नृत्य, नाट्यछटा व संदेशपर घोषणा सुरू झाल्या. त्यामुळे उपस्थित नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली व काही क्षणांतच मोठ्या प्रमाणात गर्दी जमली.

फ्लॅश मॉबमधून एच.आय.व्ही./एड्स कसा होत नाही, कसा होतो, त्याची लक्षणे, प्रतिबंधक उपाय, सुरक्षित लैंगिक वर्तन, रक्त तपासणीचे महत्त्व, तसेच एच.आय.व्ही. बाधित व्यक्तींशी भेदभाव करू नये, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने सामावून घ्यावे, असे महत्त्वाचे संदेश सादर करण्यात आले. नृत्य, गीत, अभिनय व घोषणांच्या माध्यमातून हे संदेश सोप्या व परिणामकारक पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान “एच.आय.व्ही./एड्स हा संसर्गजन्य आजार आहे, स्पर्शाने होत नाही”, “सुरक्षिततेची काळजी घ्या, तपासणी करा”, “भेदभाव नको, सहकार्य हवे”, “माहिती हीच खरी सुरक्षितता” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणामुळे नागरिकांमध्ये सकारात्मक प्रतिसाद उमटला. अनेक नागरिकांनी थांबून संपूर्ण कार्यक्रम पाहिला व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

आजच्या उपक्रमामुळे विशेषतः युवक, महिला व कामगार वर्गामध्ये एच.आय.व्ही./एड्स बाबत जागरूकता वाढल्याचे दिसून आले. काही नागरिकांनी विद्यार्थ्यांकडे या आजाराबाबत प्रश्न विचारले व योग्य माहिती जाणून घेतली. यावरून अशा प्रकारच्या जनजागृती उपक्रमांची समाजाला किती गरज आहे, हे स्पष्ट झाले. विद्यार्थ्यांनी समाजकार्याच्या तत्त्वांना अनुसरून समाजातील संवेदनशील विषय हाताळताना जबाबदारीची भूमिका बजावली. समाजात परिवर्तन घडवून आणण्यासाठी समाजकार्याचे विद्यार्थी प्रत्यक्ष कृतीतून योगदान देऊ शकतात, याचे उत्तम उदाहरण या फ्लॅश मॉब कार्यक्रमातून पाहायला मिळाले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल महाविद्यालय प्रशासनाने सहभागी सर्व विद्यार्थी, मार्गदर्शक प्राध्यापक व सहकार्य करणाऱ्या सर्व घटकांचे अभिनंदन केले. भविष्यातही अशाच प्रकारचे समाजोपयोगी, आरोग्यविषयक व जनजागृतीपर उपक्रम सातत्याने राबविण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आले.

मुंबई येथील यंग क्रिएटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड चे हर्ष कदम व अंकित श्रीवास्तव यांच्या मार्गदर्शनाखाली फ्लॅश मॉब कार्यक्रम घेण्यात आला. सदरील कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्राचार्य प्रकाश जाधव, रेड रेबीन क्लबचे समन्वयक डॉ. हनुमंत साळुंके, आयसीटीसी केंद्रातील समुपदेशक श्री धनराज पवार, जिल्हा कार्यक्रमाधिकारी श्री सुहास कुलकर्णी, श्री नवनाथ चव्हाण व रेड रिबिन क्लबचे सर्व सदस्य यांनी परिश्रम घेतले.


Categories

Recent Posts