Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

स्व.नाना पालकर स्मृती राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे खोलेश्वर महाविद्यालयात आयोजन

Updated: डिसेंबर 8, 2025

By Vivek Sindhu

हाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे खोलेश्वर महाविद्यालयात आयोजन

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई (प्रतिनिधी) – भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या खोलेश्वर महाविद्यालयामध्ये स्व.नाना पालकर स्मृती राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन गुरूवार, दिनांक ११ डिसेंबर २०२५ रोजी करण्यात आले आहे. भक्ती आणि शक्तीचा संगम तरूणांच्या जीवनात घडावा त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान वृद्धिंगत व्हावे हा या स्पर्धेचा विधायक हेतू आहे. या दृष्टिकोनातूनच वक्तृत्व स्पर्धेच्या विषयांची निवड केली आहे. राष्ट्र, समाज आणि शिक्षण या त्रिसूत्रीला अनुसरून ही वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली आहे.

खोलेश्वर महाविद्यालय हे मागील ५४ वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात विविध सामाजिक, शैक्षणिक गुणवत्तेच्या वाढीसाठी सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. चालू शैक्षणिक वर्षात राष्ट्रात नवचैतन्य निर्माण करणाऱ्या ‘वंदे मातरम्’ या गीताला यावर्षी १५० वर्षे पूर्ण झाले आहेत. बंकीमचंद्र चट्टोपाध्याय यांचे हे ‘वंदे मातरम्’ गीत भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे प्रेरणास्त्रोत होते. ते स्वातंत्र्यलढ्याचे घोषवाक्य ठरले. या निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन महाविद्यालय करीत आहे. हे या वक्तृत्व स्पर्धेचे ५५ वे वर्ष आहे. या स्पर्धेसाठी जास्तीत जास्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन संयोजक तथा महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.दीपक शिवलिंगराव फुलारी यांनी केले आहे. स्पर्धेचे विषय पुढीलप्रमाणे आहेत. १) वंद्य वंदे मातरम्, २) नागरिकांची कर्तव्ये व माझे वर्तन, ३) हरित भारत-समृध्द भारत, ४) आधुनिक तंत्रज्ञान : विकसित भारत…, आणि ५) नारी घे भरारी असे आहेत. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांना संलग्न असलेली वरिष्ठ महाविद्यालये, कनिष्ठ महाविद्यालये तसेच माध्यमिक विद्यालयांना जोडून असलेल्या उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना या स्पर्धेत भाग घेता येईल. सदरील स्पर्धा गुरूवार, दि.११ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी दहा वाजता स्व.गोपीनाथराव मुंडे सभागृहात सुरू होईल. भारतीय शिक्षण प्रसारक संस्था ही रा.स्व.संघाच्या विचाराने प्रेरित होऊन १९५१ पासून ज्ञानदानाचे पवित्र कार्य करीत आहे. ‘केल्यानें होत आहे रें। आधीं केलेंची पाहिजे।’ हे ब्रीद डोळ्यांसमोर ठेवून वाटचाल करणाऱ्या भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेची एकूण ५२ संस्कार केंद्रे (शाळा /महाविद्यालये) आहेत. खोलेश्वर महाविद्यालय १९७२ पासून शिक्षणातून संस्कारक्षम पिढी घडवित आहे. खोलेश्वर महाविद्यालयाच्या उभारणीत संघ स्वयंसेवकांचे, संघ प्रचारकांचे मोठे योगदान आहे. संघाचे प्रचारक स्व.नाना पालकर यांच्या नांवाने चालविल्या जाणाऱ्या या वक्तृत्व स्पर्धेचे हे ५५ वे वर्ष आहे. ही स्पर्धा संघ प्रचारक स्व.मोरोपंतजी पिंगळे यांच्या प्रेरणेने खोलेश्वर माध्यमिक विद्यालयात सुरू झाली. महाविद्यालयाच्या स्थापनेनंतर महाविद्यालयाने या स्पर्धेच्या आयोजनाची धुरा समर्थपणे सांभाळली. स्व.नारायण हरी तथा नाना पालकर हे समर्पित जीवनाचा एक दीपस्तंभ होते. स्व.नाना पालकर यांच्या परिसस्पर्शाने अनेकांच्या जीवनाचे सोने झाले, त्यामुळेच अनेक ध्येयवेडे तरूण राष्ट्रकार्यासाठी पुढे आले. उत्तम प्रतिभावंत कवी असलेल्या देशभक्त स्व.नाना पालकर यांनी विपुल प्रमाणात देशभक्तिपर लिखाण केले आहे. त्यांच्या नांवाने ही स्पर्धा आयोजित करताना आम्हास अत्यंत आनंद वाटतो. राष्ट्र, समाज, शिक्षण व पर्यावरण या चतुःसूत्रीला अनुसरून ही वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तरी या स्पर्धेसाठी आपला संघ पाठवावा, अशी विनंती व आवाहन संयोजकांनी केले आहे. स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे आहेत. स्पर्धेचे माध्यम मराठी असेल. पदव्युत्तर विद्यार्थ्यांना स्पर्धेत भाग घेता येणार नाही. प्रत्येक स्पर्धकास ७ मिनिटे (५+२=७ मिनिटे) वेळ दिला जाईल. प्रत्येक संघातील स्पर्धकांच्या गुणांची बेरीज करून संघाचे गुण मोजले जातील व अधिक गुण मिळविणाऱ्या संघाला चषक (१ वर्षासाठी) देण्यात येईल. प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ पारितोषिके वैयक्तिक असतील. प्रत्येक स्पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र व भोजन देण्यात येईल. स्पर्धेतील भाषणे ही पारितोषिके देण्याइतपत पात्रतेची झाली नाहीत असे परीक्षकांचे मत झाल्यास पारितोषिक रद्द करण्याचा अधिकार संयोजकास राहील. स्पर्धेचे सांघिक शुल्क रू. १००/- राहिल. प्रत्येक महाविद्यालयातून कनिष्ठ विभागातून दोन व वरिष्ठ विभागातून दोन विद्यार्थ्यांच्या संघास स्पर्धेसाठी नोंदणी करता येईल. नोंदणी केलेल्या स्पर्धकांचा व्हाट्सॲप ग्रुप तयार करून स्पर्धेच्या इतर सूचना त्या व्हाट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून वेळोवेळी देण्यात येतील. स्पर्धेच्या दिवशी सकाळी ९.०० ते १०.०० वाजता पर्यंत नोंदणी करता येईल. स्पर्धकांच्या विचारांशी संयोजक सहमत असतीलच असे नाही. मा.अंबाजोगाई न्यायालयाच्या कक्षेत. तसेच प्रथम पारितोषिक – रूपये ७००१/- व सन्मानचिन्ह, द्वितीय पारितोषिक – रूपये ५००१/- व सन्मानचिन्ह, तृतीय पारितोषिक – रूपये ३००१/- व सन्मानचिन्ह आणि उत्तेजनार्थ दोन पारितोषिके प्रत्येकी रूपये ११०१/- व सन्मानचिन्ह असे पारितोषिकांचे स्वरूप आहे. विद्यार्थ्यांनी आपली नोंदणी स्पर्धा प्रमुख प्रा.योगेश कुलकर्णी (भ्रमणध्वनी क्रमांक – ९४०३०३७०११) तसेच स्पर्धा सहप्रमुख प्रा.तुळशीराम मुंढे (भ्रमणध्वनी क्रमांक – ८६९८७९५४११) यांच्याकडे करावी असे आवाहन स्व.नाना पालकर स्मृती राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे संयोजक तथा महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.दीपक शिवलिंगराव फुलारी यांनी केले आहे.


Categories

Recent Posts