Breaking
Updated: जानेवारी 17, 2026
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelसूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला मिळाले राष्ट्रीय मान्यता मंडळाचे प्रमाणपत्र
अंबाजोगाई: स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (स्वाराती) शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. येथील सूक्ष्मजीवशास्त्र विभागांतर्गत कार्यरत असलेल्या प्रयोगशाळांना त्यांच्या दर्जेदार सेवेबद्दल ‘राष्ट्रीय मान्यता मंडळ’ (NABL) कडून मानाचे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. १६ जानेवारी २०२६ रोजी या मान्यतेचे अधिकृत पत्र मिळाल्याने महाविद्यालयाच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या विभागात कार्यरत असलेले एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्र (ICTC), स्टेट रेफरन्स लॅबोरेटरी आणि व्हायरल लोड या प्रयोगशाळा २०२० पासून एन ए बी एल मानांकन प्राप्त आहेत. या प्रयोगशाळांमध्ये प्रामुख्याने एचआयव्ही संशयित रुग्णांची चाचणी, त्यांचे समुपदेशन आणि एचआयव्ही बाधित रुग्णांमधील विषाणूंची संख्या तपासणे अशा अत्यंत महत्त्वाच्या चाचण्या केल्या जातात. केवळ संख्यात्मकच नव्हे तर गुणात्मक दृष्टिकोनातूनही या प्रयोगशाळांनी राज्यात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. प्रतिवर्षी या केंद्रांमार्फत अंदाजे ४८ हजारांहून अधिक चाचण्या केल्या जातात, जी आकडेवारी राज्यातील इतर शासकीय प्रयोगशाळांच्या तुलनेत उल्लेखनीय मानली जाते.
मिळालेल्या माहितीनुसार, २७ व २८ डिसेंबर २०२५ रोजी एन ए बी एल संस्थेच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाकडून या प्रयोगशाळांचे सखोल परीक्षण करण्यात आले होते. दोन दिवस चाललेल्या या प्रक्रियेत प्रयोगशाळेतील उपकरणांची अचूकता, कामकाजाची पद्धत, स्वच्छतेचे निकष आणि गुणवत्ता तपासण्यात आली. या सर्व चाचण्यांमध्ये प्रयोगशाळेने उच्च मानांकन राखल्याने १६ जानेवारी रोजी या प्रयोगशाळेला पुढील कालावधीसाठी अधिकृतरीत्या मान्यता बहाल करण्यात आली.
या यशामागे अधिष्ठाता डॉ. शंकर धपाटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. राकेश जाधव आणि सूक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख डॉ. भाऊसाहेब मुंडे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच सहयोगी प्राध्यापक डॉ. संदीप निळेकर आणि डॉ. दिपाली कुलकर्णी यांनी या परीक्षणासाठी विशेष सहकार्य केले. प्रयोगशाळेचे दैनंदिन कामकाज आणि एन ए बी एल परीक्षणाची संपूर्ण जबाबदारी नोडल ऑफिसर म्हणून डॉ. अमित लोमटे व डॉ. अर्जुन जाधव यांनी यशस्वीपणे पार पाडली. प्रयोगशाळेतील सर्व समुपदेशक आणि तंत्रज्ञांनी घेतलेल्या परिश्रमामुळेच हे यश प्राप्त झाले असून, यामुळे परिसरातील सामान्य रुग्णांना अधिक दर्जेदार आणि खात्रीशीर वैद्यकीय सेवा उपलब्ध होणार आहे.