Breaking
Updated: जून 8, 2026
लाच घेतल्याच्या प्रकरणातून अंबाजोगाई आगार व्यवस्थापकासह दोघांची सन्मानपूर्वक निर्दोष मुक्तता
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई: येथील विशेष न्यायालयाने एका महत्त्वपूर्ण निकालात लाच घेतल्याच्या आरोपातून तत्कालीन आगार व्यवस्थापक कुरेशी मोहम्मद जाफर आणि वाहक नंदकुमार जैस्वाल यांची सर्व आरोपांतून सन्मानपूर्वक निर्दोष मुक्तता केली आहे. विशेष न्यायाधीश डॉ. रचना तेहरा यांनी ५ जून २०२६ रोजी हा बहुप्रतीक्षित निकाल दिला. सन २०१८ मधील या प्रकरणात अभियोजन पक्षाला आरोपींविरुद्ध लाचेची मागणी संशयातीतरीत्या सिद्ध करता आली नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. एका एस.टी. चालकावरील विभागीय चौकशीतील शिक्षा कमी करण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच घेतल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता, मात्र तब्बल आठ वर्षे चाललेल्या या कायदेशीर लढाईनंतर न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोषमुक्त केले आहे.
हे प्रकरण २०१८ मध्ये उघडकीस आले होते, जेव्हा एस.टी. चालक संजय कांदे यांच्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कारवाई केली होती. या कारवाईनंतर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले होते. सुनावणी दरम्यान न्यायालयाने फिर्यादी, पंच साक्षीदार आणि तपास अधिकाऱ्यांसह एकूण चार साक्षीदारांची साक्ष नोंदवली. उपलब्ध पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबाची सखोल तपासणी केल्यानंतर, आगार व्यवस्थापकांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे लाच मागितल्याचा कोणताही ठोस आणि विश्वासार्ह पुरावा समोर आला नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
न्यायालयाने आपल्या निकालात एक अत्यंत महत्त्वाचे कायदेशीर निरीक्षण नोंदवले की, केवळ रक्कम जप्त झाली म्हणून गुन्हा सिद्ध होत नाही. लाच घेतल्याच्या गुन्ह्यासाठी लाचेची स्पष्ट मागणी आणि तिचा स्वीकार या दोन्ही बाबी कायदेशीर पुराव्यांसह सिद्ध होणे आवश्यक असते, जे सादर करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरला. या खटल्यात आरोपींच्या वतीने प्रसिद्ध वकील ॲड. व्ही. आर. देशपांडे, ॲड. अजित लोमटे आणि ॲड. कदम यांनी न्यायालयात प्रभावी युक्तिवाद केला. हा कायदेशीर युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश दिले.