Breaking
Updated: मे 26, 2026
अंबाजोगाईत गोट फार्मची जाळी कापून शेळ्यांची चोरी
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई: शहरात शेतातील गोट फार्मच्या शेडची जाळी कापून अज्ञात चोरट्यांनी ९५ हजार रुपये किमतीच्या मौल्यवान शेळ्या आणि बोकड पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चनई शिवारातील बीड रस्त्यालगत हॉटेल शिवनेरीच्या समोर सुरेशकुमार रमेशराव कदम यांचे गट क्र. ३५५ मध्ये शेत आहे. ते शेतीसोबतच ‘दादा गोट फार्म’ नावाचा शेळीपालनाचा व्यवसाय करतात. ३० एप्रिल २०२६ रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास त्यांचे वडील शेळ्यांची राखण करण्यासाठी फार्मवर गेले होते. नेहमीप्रमाणे शेळ्यांची पाहणी करून ते शेडसमोर झोपले. मात्र, १ मे २०२६ रोजी सकाळी ६ वाजता त्यांना शेडमधील तीन शेळ्या आणि तीन बोकडे गायब असल्याचे दिसले. शेडच्या मागच्या बाजूची जाळी कापून चोरट्यांनी आत प्रवेश केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
चोरट्यांनी फार्ममधून बिट्टल जातीच्या एकूण ६ जनावरांचा माल लंपास केला. चोरीला गेलेल्या या जनावरांची एकूण किंमत ९५,००० रुपये आहे. सुरेशकुमार कदम यांच्या तक्रारीवरून अंबाजोगाई शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस निरीक्षक शरद बाबूराव जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भागवत व्यंकटराव कांदे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.