Breaking

लग्नाचा दबाव आणि धमकीला कंटाळून तरुणाची गळफास लावून आत्महत्या; प्रेयसीविरुद्ध गुन्हा दाखल

Updated: मे 19, 2026

By Vivek Sindhu

जेसीबी चालकावर डिझेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न; ३ जणांवर प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज: येथील पंचायत समितीच्या पाठीमागे भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या एका ३८ वर्षीय विवाहित तरुणाने लग्नाचा दबाव, मानसिक त्रास आणि खोट्या गुन्ह्याची धमकी दिल्यामुळे गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात मृत तरुणाच्या प्रेयसीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

हिना अन्वर शेख (रा. जाधवजवळा, सध्या रा. केज) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यांचे पती अन्वर दिलावर शेख (वय ३८) यांचे गावातील पूजा संभाजी गालफाडे हिच्यासोबत अनैतिक प्रेमसंबंध होते. या त्रासाला कंटाळून शेख कुटुंब केज येथे राहण्यास आले होते. मात्र, पूजा गालफाडे ही अन्वर यांना वारंवार फोन व मेसेज करून “तुझ्या बायकोला सोडून दे, माझ्याशी लग्न कर, नाहीतर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करीन,” अशी धमकी देऊन मानसिक छळ करत होती.

मुलांना सुट्ट्या असल्याने अन्वर यांनी पत्नीला १६ मे रोजी अहिल्यानगर येथे बहिणीकडे सोडले होते व ते स्वतः केज येथील घरी परत आले. १८ मे रोजी सकाळी हिना यांनी फोन केला असता पतीचा फोन लागला नाही. त्यामुळे त्यांनी सासऱ्यांना घरी पाहण्यास सांगितले. सासऱ्यांनी खिडकीतून पाहिले असता अन्वर यांनी छताच्या पंख्याला कापडी शॉलने गळफास घेतल्याचे उघड झाले. पूजा गालफाडे हिच्या सततच्या धमक्यांमुळे मानसिक तणावात येऊन अन्वर यांनी आत्महत्या केली. या प्रकरणी केज पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उमेश निकम पुढील तपास करत आहेत.


Categories

Recent Posts