Breaking

वृद्धाला बेदम मारहाण करून दुचाकीसह रोख रक्कम लुटली; दोन अनोळखी स्कुटीस्वारांवर गुन्हा दाखल

Updated: मे 19, 2026

By Vivek Sindhu

जेसीबी चालकावर डिझेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न; ३ जणांवर प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

गेवराई: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वरील रांजणी शिवार परिसरात एका वृद्धाला गाठून दोन अनोळखी स्कुटीस्वारांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संशयितांनी वृद्धाचे कपडे फाडून, त्यांना जबर धाक दाखवत खिशातील रोख रक्कम आणि ५० हजार रुपये किमतीची दुचाकी बळजबरीने चोरून नेली. या जबरी चोरीच्या घटनेमुळे हायवे परिसरात प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

सुदाम निवृत्ती सावंत (वय ६५) रा. रांजणी, तालुका गेवराई, जिल्हा बीड यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून दोन अनोळखी स्कुटी चालकांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी सावंत हे पहाटेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना हा प्रकार घडला.

रांजणी शिवार परिसरात फिर्यादी सुदाम सावंत हे बाथरूम करून आपल्या दुचाकीजवळ आले आणि गाडी चालू करून निघणार तोच दोन अनोळखी इसम स्कुटीवरून त्यांच्याजवळ आले. संशयितांनी सावंत यांची दुचाकी खाली पाडून त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत सावंत यांच्या डाव्या बरगडीला आणि डाव्या पायाला जबर मुक्कामार लागला. संशयितांनी एवढ्यावरच न थांबता फिर्यादीचे कपडे फाडले आणि बळजबरीने धाक दाखवून त्यांच्या खिशातील १ हजार ४०० रुपयांची रोख रक्कम काढून घेतली. त्यानंतर ५० हजार रुपये किमतीची मोटार सायकल क्रमांक एम.एच. २३ बी.व्ही. २०३४ घेऊन आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

या घटनेनंतर जखमी वृद्धाने गेवराई पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेला प्रकार सांगितला. गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार जायभाये करत आहे.


Categories

Recent Posts