Breaking

जमीन मोजणीच्या वादातून महिलेला जळत्या लाकडाने मारहाण

Updated: मे 19, 2026

By Vivek Sindhu

जमीन मोजणीच्या वादातून महिलेला जळत्या लाकडाने मारहाण

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

आष्टी: जमीन मोजून देण्याच्या जुन्या वादातून तालुक्यातील गितेवाडी येथे भावकीमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या वादात एका महिलेला जळत्या लाकडाने मारहाण करून जखमी करण्यात आले, तर तिच्या पती आणि सासूला लाकडी काठीने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेप्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गितेवाडी दादेगाव येथील रहिवासी सोनाली रामा गिते या २४ वर्षीय महिलेने याप्रकर्णी अंभोरा पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून नामदेव भीमराव गिते, रंजना नामदेव गिते आणि सुमनबाई भीमराव गिते (सर्व रा. गितेवाडी दादेगाव, ता. आष्टी, जि. बीड) यांच्याविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांचे जवळचे नातेवाईक असून त्यांच्यात जमिनीच्या कारणावरून पूर्ववैमनस्य होते.

सोमवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास जमीन मोजून देण्याच्या कारणावरून त्यांच्यात पुन्हा वाद सुरू झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपी नामदेव गिते याने घरातील चुलीतील जळते लाकूड काढून फिर्यादी सोनाली यांच्या उजव्या हातावर मारले, यात त्या गंभीर जखमी झाल्या. याच वेळी इतर आरोपी रंजना गिते आणि सुमनबाई गिते यांनी फिर्यादीचे पती व सासू यांना लाकडी काठीने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच यापुढे गेल्यास जिवे मारण्याची धमकी दिली.

या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पीडित महिलेने अंभोरा पोलीस ठाणे गाठून आपबिती कथन केली. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ३२४(४), ३५२, ३५१(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार तांदळे करत आहेत.


Categories

Recent Posts