Breaking

अधिक मासाच्या स्नानासाठी गेलेल्या १२ वर्षीय मुलाचा गोदावरी नदीत बुडून मृत्यू

Updated: मे 19, 2026

By Vivek Sindhu

माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तम पुरी येथील दुर्घटना

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तम पुरी येथील दुर्घटना

माजलगाव: तालुक्यातील प्रसिद्ध पुरुषोत्तम पुरी येथे पवित्र अधिक मासानिमित्त गोदावरी नदीत स्नानासाठी उतरलेल्या माजलगाव येथील एका १२ वर्षीय बालकाचा पाण्याचा अंदाज न आल्याने खोल पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना आज सकाळी ८ ते ९ वाजेच्या सुमारास घडली असून आकाश लक्ष्मण मेह्त्रे (वय १२, रा. पाटील गल्ली, माजलगाव) असे मृत बालकाचे नाव आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत असून धार्मिक उत्सवाच्या आनंदावर विरजण पडले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अधिक मासाचे विशेष महत्त्व असल्याने आकाश हा आपल्या कुटुंबीयांसोबत पुरुषोत्तम पुरी येथे दर्शनासाठी आणि पवित्र स्नानासाठी आला होता. सकाळी कुटुंबासोबत असताना तो गोदावरी नदीच्या पात्रात उतरला. मात्र, पात्रातील पाण्याचा आणि खोलीचा अंदाज न आल्याने तो अचानक खोल पाण्यात वाहून गेला. आकाश पाण्यात बुडत असल्याचे लक्षात येताच परिसरात एकच खळबळ उडाली आणि उपस्थित भाविकांसह स्थानिक ग्रामस्थांनी त्याला वाचवण्यासाठी तत्काळ नदीपात्रात धाव घेतली.

स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय यंत्रणेने अत्यंत युद्धपातळीवर शोधकार्य राबवून आकाशला मोठ्या प्रयत्नांनंतर पाण्याबाहेर काढले. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र तपासणीअंती डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. अधिक मासाच्या काळात गोदावरी पात्रात देशभरातून लाखो भाविक स्नानासाठी येत असल्याने, प्रशासनाने सुरक्षेच्या उपाययोजना वाढवाव्यात आणि भाविकांनीही पाण्याचा अंदाज घेऊनच नदीत उतरावे, असे जाहीर आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


Categories

Recent Posts