Breaking
Updated: एप्रिल 21, 2026
जाब विचारला अन् तरुणावर विळ्याचा घाव घातला
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई: तालुक्यातील उजणी शिवारात शेतातील उभ्या ज्वारीच्या पिकातून ट्रॅक्टर नेल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून एका तरुणावर विळ्याने हल्ला करून त्याला जखमी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बर्दापूर पोलीस ठाण्यात एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनेश देविदास माने (वय ३२, रा. उजणी) यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली आहे. १८ एप्रिल २०२६ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास दिनेश हे शिवराज माने आणि पृथ्वीराज कवडे यांच्यासह शेत गट क्रं ३३३ मध्ये असताना ही घटना घडली. गावातीलच आबासाहेब शिवाजी माने याने दिनेश यांच्या ज्वारीच्या पिकातून ट्रॅक्टर नेला. पीक तुडवल्याचा जाब विचारल्यावर आरोपीने “तुला काय करायचे ते कर” असे म्हणून शिवीगाळ केली आणि हातातील विळ्याने दिनेशच्या डाव्या डोळ्याखाली गालावर मारून त्याला जखमी केले. यावेळी उपस्थित असलेल्या साक्षीदारांनी मध्यस्थी करत भांडण सोडवले.
मारहाण केल्यानंतरही आरोपीचा राग शांत झाला नाही. त्याने पुन्हा एकदा ट्रॅक्टर दिनेशच्या अंगावर घालून जिवे मारण्याची धमकी दिली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ३५१(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस हवालदार संजय राठोड या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.