Breaking

मुलबाळ होत नाही आणि चारित्र्यावर संशय; विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या, पतीसह सासऱ्याविरुद्ध गुन्हा

Updated: एप्रिल 21, 2026

By Vivek Sindhu

मुलबाळ होत नाही आणि चारित्र्यावर संशय; विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या, पतीसह सासऱ्याविरुद्ध गुन्हा

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

पाटोदा: चारित्र्यावर संशय घेऊन होणारी मानसिक पिळवणूक आणि मुलबाळ होत नसल्याच्या टोमण्यांना कंटाळून पाटोदा तालुक्यातील चुंभळी येथे एका २२ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. या हृदयद्रावक घटनेप्रकरणी पाटोदा पोलिसांनी मृत महिलेच्या पती आणि सासऱ्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

वैशाली रमेशराव आमले (वय ४२ वर्षे, रा. अमरावती) यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांची मुलगी समीक्षा हिचा मे २०२४ मध्ये चुंभळी येथील सुरज तुकाराम पवळ याच्याशी प्रेमविवाह झाला होता. मात्र, लग्नाच्या काही महिन्यांनंतरच समीक्षाचा छळ सुरू झाला. समीक्षाने आपल्या आईला वारंवार कळवले होते की, पती सुरज याला दारूचे व्यसन असून तो किरकोळ कारणावरून सतत भांडण करतो. तसेच, पती आणि सासरा तुकाराम ज्ञानोबा पवळ हे दोघेही तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मानसिक त्रास देत असत. यातच, “तुला मुलबाळ होत नाही” असे म्हणून सासरा तिला सतत टोमणे मारून अपमानित करत असे.

१९ एप्रिल २०२६ रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास समीक्षाने आईला फोन करून रडत आपली व्यथा सांगितली होती. त्याच दिवशी दुपारी ३ वाजेच्या सुमारास समीक्षाने राहत्या घरी फॅनला गळफास घेतल्याची माहिती तिच्या माहेरच्या लोकांना मिळाली. छळाला कंटाळून तिने हे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८, ३५२ आणि ८५ अन्वये गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक भगवान भाबड पुढील तपास करत आहेत.


Categories

Recent Posts