Breaking
Updated: फेब्रुवारी 2, 2026
अंबाजोगाईत रिक्षा चालकांना पोलिसांचा सक्त इशारा
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई: शहरातील शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या रिक्षा आणि व्हॅन चालकांनी सुरक्षिततेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, अन्यथा कडक कारवाईला सामोरे जावे लागेल, असा कडक इशारा अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी दिला आहे. अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात आयोजित रिक्षा व व्हॅन चालकांच्या विशेष बैठकीत ते बोलत होते.
या महत्वपूर्ण बैठकीला अंबाजोगाई शहरातील सुमारे १५० ते १७५ रिक्षा व व्हॅन चालक उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी सर्व चालकांना गणवेश परिधान करणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले. शाळेत जाणाऱ्या चिमुकल्या जीवांची जबाबदारी चालकांवर मोठी असते, त्यामुळे ही वाहतूक करताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. अनेकदा रिक्षांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी बसवले जातात, ही बाब अत्यंत धोकादायक असून यापुढे ओव्हरलोडिंग करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असेल, असे जोगदंड यांनी यावेळी बजावले.
वाहतुकीच्या नियमांबाबत मार्गदर्शन करताना चालकांनी आपली व वाहनाची सर्व वैध कागदपत्रे नेहमी स्वतःजवळ बाळगावीत, असेही सांगण्यात आले. विद्यार्थी वाहतूक करताना आवश्यक असणारी सर्व सुरक्षा उपकरणे आणि उपाययोजना वाहनात असणे अनिवार्य आहे. याचबरोबर शहरात वाढणाऱ्या वाहतूक कोंडीचा विचार करता, बस स्थानक परिसर किंवा सार्वजनिक रहदारीला अडथळा निर्माण होईल अशा ठिकाणी रिक्षा उभ्या करू नयेत, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
यावेळी उपस्थित रिक्षा चालकांनीही आपल्या दैनंदिन कामात येणाऱ्या अडीअडचणी पोलिसांसमोर मांडल्या. पोलिसांनी त्यांच्या समस्या जाणून घेत सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. मात्र, नियम पाळण्याबाबत कोणतीही सूट मिळणार नसल्याचे स्पष्ट केले. सर्व वाहनधारकांना येत्या सोमवारपर्यंत आपली कागदपत्रे आणि इतर त्रुटी पूर्ण करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. ही मुदत संपल्यानंतर पोलीस वाहतूक विभागामार्फत शहरात विशेष मोहीम राबवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमित दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.