Breaking

धनादेश अनादर प्रकरणी आरोपीची निर्दोष मुक्तता; ॲड. प्रवीण मेटे यांचा युक्तिवाद ठरला प्रभावी

Updated: जानेवारी 23, 2026

By Vivek Sindhu

धनादेश अनादर प्रकरणी आरोपीची निर्दोष मुक्तता; ॲड. प्रवीण मेटे यांचा युक्तिवाद ठरला प्रभावी

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई: कोदरी येथील सुरज याने कळंब येथील जुबेर गणी पठाण यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या ६२ हजार रुपयांच्या धनादेश अनादर (कलम १३८) खटल्यात अंबाजोगाई न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणात ॲड. प्रवीण योगीराज मेटे यांनी केलेला कायदेशीर युक्तिवाद आणि फिर्यादीची घेतलेली उलटतपासणी निकालात अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली.

या खटल्याची पार्श्वभूमी अशी की, १२ जून २०१६ रोजी जुबेर पठाण याने ६२ हजार रुपये एक महिन्याच्या मुदतीवर हात उसने घेतले होते. ही रक्कम वेळेत न मिळाल्याने फिर्यादीने तगादा लावला असता आरोपीने तांदुळजा येथील बँकेचा धनादेश दिला होता. मात्र, खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने राजश्री शाहू बँक, अंबाजोगाई येथून तो धनादेश अनादरित होऊन परत आला. याप्रकरणी सुरज याने कायदेशीर नोटीस बजावूनही दाद न मिळाल्याने अंबाजोगाई येथील दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर ३ यांच्या न्यायालयात फिर्याद दाखल केली होती.

न्यायालयीन कामकाजादरम्यान फिर्यादी आणि साक्षीदार अमोल पांडुरंग यादव यांची साक्ष नोंदवण्यात आली. यावेळी ॲड. प्रवीण मेटे यांनी फिर्यादी पक्षाच्या पुराव्यांमधील त्रुटी आणि विसंगती न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. त्यांनी केलेला प्रभावी युक्तिवाद आणि कायद्यातील तांत्रिक बाबींचा आधार न्यायालयाने ग्राह्य धरला.

उपलब्ध पुरावे आणि वस्तुस्थिती पाहता आरोपीवरील आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत. परिणामी, ७ जानेवारी २०२६ रोजी न्यायालयाने जुबेर गणी पठाण यांची या प्रकरणातून सन्मानपूर्वक निर्दोष मुक्तता केली. या संपूर्ण कायदेशीर प्रक्रियेत आरोपीच्या वतीने ॲड. प्रवीण मेटे यांनी यशस्वीरीत्या बाजू मांडून आपल्या पक्षकाराला न्याय मिळवून दिला.


Categories

Recent Posts