Breaking

वर्षभरात १६,६४० मातांना मिळाला पुनर्जन्म!

Updated: जानेवारी 16, 2026

By Vivek Sindhu

'स्वाराती' रुग्णालयाच्या स्त्रीरोग विभागाची गौरवास्पद कामगिरी

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

‘स्वाराती’ रुग्णालयाच्या स्त्रीरोग विभागाची गौरवास्पद कामगिरी

अंबाजोगाई: येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (स्वाराती) स्त्रीरोग व प्रसूती शास्त्र विभागाने २०२५ या वर्षात सेवेचा नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. विभागातील डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांच्या सांघिक परिश्रमामुळे वर्षभरात तब्बल १६ हजार ६४० मातांना यशस्वी उपचार मिळून एक प्रकारे पुनर्जन्मच मिळाला आहे. गोरगरीब रुग्णांसाठी हे रुग्णालय खऱ्या अर्थाने जीवनवाहिनी ठरले असून, अत्याधुनिक सोयीसुविधांच्या जोरावर या विभागाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

आशिया खंडातील पहिले ग्रामीण रुग्णालय म्हणून नावलौकिक असलेल्या ‘स्वाराती’ महाविद्यालयाला आता ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या सुवर्णमहोत्सवी वर्षात स्त्रीरोग विभागाने केलेली कामगिरी कौतुकास्पद आहे. विभागात दरमहा सरासरी १ हजार ३८६, तर दररोज सरासरी ४६ शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. यामध्ये ६ हजार ७५८ सिझेरियन प्रसूती, १ हजार ६५४ कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, १ हजार ३५ गर्भपात शस्त्रक्रिया, २७६ गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रिया आणि ६३० इतर गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांचा समावेश आहे. विशेष म्हणजे ६ हजार २८७ नैसर्गिक प्रसूती देखील या विभागात यशस्वीरीत्या पार पडल्या आहेत.

या यशात विभागप्रमुख डॉ. गणेश तोंडगे यांच्यासह २२ निवासी डॉक्टर, परिचारिका आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा आहे. विभागाकडे मनुष्यबळ कमी असतानाही, रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन येथील डॉक्टरांनी अहोरात्र सेवा दिली आहे. अत्यंत अवघड आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया देखील कोणत्याही अडथळ्याशिवाय येथे पूर्ण करण्यात आल्या. नवजात बालके आणि मातांची विशेष काळजी घेण्यासाठी येथे सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. रुग्णालयात उपलब्ध असलेले सुसज्ज ‘मॉड्युलर ऑपरेशन थिएटर’ या प्रक्रियेत अत्यंत उपयुक्त ठरले आहे.

२४ आठवड्यानंतरही कायदेशीररित्या गर्भपात शक्य

कायद्यातील बदलानुसार, वैद्यकीय गर्भपात (सुधारणा) कायदा २०२१ ची प्रभावी अंमलबजावणी देखील येथे केली जात आहे. डॉ. गणेश तोंडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता २४ आठवड्यांनंतरही काही विशेष परिस्थितीत गर्भपात करणे कायदेशीररीत्या शक्य झाले असून, ‘स्वाराती’ मधील अधिकृत वैद्यकीय मंडळाला स्थानिक पातळीवर याचे अधिकार प्राप्त झाले आहेत. यामुळे अनेक गरजू रुग्णांना उच्च न्यायालयापर्यंत जाण्याची गरज उरलेली नाही.

बीड जिल्ह्यासह आजूबाजूच्या सहा जिल्ह्यांतील रुग्ण उपचारासाठी अंबाजोगाईच्या या रुग्णालयात येतात. खाजगी रुग्णालयांमधील खर्च न पेलणाऱ्या सर्वसामान्य आणि गोरगरीब रुग्णांसाठी अत्यल्प दरातील हे उत्कृष्ट उपचार मोठे वरदान ठरत आहेत. प्रशासकीय मर्यादा आणि कामाचा प्रचंड ताण असूनही, रुग्णांना देण्यात येणारी दर्जेदार सेवा ‘स्वाराती’च्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी ठरली आहे.


Categories

Recent Posts