Breaking

“मिसेस महाराष्ट्र” उपविजेत्या डॉ. सुनीता तोंडगे यांचा विशेष सत्कार; विद्यार्थिनींना दिले आरोग्य व यशाचे मंत्र

Updated: जानेवारी 10, 2026

By Vivek Sindhu

मुलींच्या शासकीय वसतिगृहात पार पडला कार्यक्रम

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

मुलींच्या शासकीय वसतिगृहात पार पडला कार्यक्रम

अंबाजोगाई: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून अंबाजोगाई येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहात ‘मिसेस महाराष्ट्र २०२५’ स्पर्धेच्या प्रथम उपविजेत्या डॉ. सुनीता तोंडगे यांचा विशेष गौरव सोहळा संपन्न झाला. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थिनींसाठी आरोग्य विषयक मार्गदर्शन शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी वसतिगृहाच्या गृहपाल श्रीमती समृद्धी सुरेश भवरे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले, तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सुनीता तोंडगे उपस्थित होत्या. या सोहळ्यात लोखंडी सावरगाव येथील आरोग्य केंद्राच्या डॉ. सारिका दांडेकर आणि न्यू व्हिजन पब्लिक स्कूलच्या तन्वी कमळकर यांची देखील उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात करताना गृहपाल समृद्धी भवरे यांनी डॉ. सुनीता तोंडगे यांचा परिचय करून दिला. अंबाजोगाईतील प्रसिद्ध भूलतज्ज्ञ असलेल्या डॉ. तोंडगे यांनी आपल्या व्यस्त वैद्यकीय व्यवसायातून आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून स्वतःचा छंद जोपासला आणि मिसेस महाराष्ट्र सारख्या प्रतिष्ठित स्पर्धेत यश संपादन केले, ही बाब विद्यार्थिनींसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर डॉ. तोंडगे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला शासकीय वसतिगृहासह संत भगवानबाबा ऊसतोड कामगार मुलींच्या वसतिगृहातील विद्यार्थिनी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. सुनीता तोंडगे यांनी यावेळी विद्यार्थिनींशी संवाद साधताना आपला स्पर्धेपर्यंतचा प्रवास उलगडून सांगितला. प्रतिकूल परिस्थितीतून ध्येय कसे गाठायचे, याचा अनुभव मांडताना त्यांनी मुलींना शिक्षणासोबतच स्वतःमधील कलागुणांना वाव देण्याचे आवाहन केले. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवणे, आत्मविश्वास बाळगणे आणि आरोग्याकडे लक्ष देणे किती महत्त्वाचे आहे, यावर त्यांनी भर दिला. तसेच, वसतिगृहात राहताना पौष्टिक आहार, वैयक्तिक स्वच्छता आणि महिलांच्या आजारांबाबत प्रतिबंधात्मक उपाय यावर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात डॉ. तोंडगे यांनी विद्यार्थिनींच्या शंकांचे निरसन करत त्वचेच्या काळजीबाबत महत्त्वपूर्ण टिप्स दिल्या. तन्वी कमळकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. सारिका दांडेकर यांनी केले. कार्यक्रमाची सांगता विद्यार्थिनींनी डॉ. तोंडगे यांच्यासोबत घेतलेल्या फोटोंनी व सेल्फीने झाली.