Breaking
Updated: जानेवारी 5, 2026
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई: येथील एका नामवंत महाविद्यालयात कार्यरत असलेल्या महिला प्राध्यापिका डॉ. ममता राठी (जाखोटिया) यांनी रविवारी दुपारी जवळगाव शिवारात स्वतःला पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण घटनेत त्या ८० टक्क्यांहून अधिक भाजल्या असून त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडवून देणाऱ्या या घटनेची माहिती मिळताच बर्दापूर पोलिसांनी सोमवारी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
दरम्यान, ममता राठी यांनी टोकाचे पाऊल का उचलले याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी लातूर येथील एका खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले असून, तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी रुग्णालयात जाऊन त्यांचा जबाब नोंदवून घेतला आहे. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी कौटुंबिक कलह, कामाचा मानसिक ताण किंवा अन्य काही गंभीर कारणांचा शोध सुरू केला आहे.
बर्दापूर पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत असून या घटनेशी संबंधित आणखी एक व्यक्ती सध्या फरार असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस त्या फरार व्यक्तीचा शोध घेत असून लवकरच या आत्महत्येच्या प्रयत्नामागील गूढ उकलण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे अंबाजोगाई शहर आणि परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत असून सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.