Breaking
Updated: डिसेंबर 17, 2025
विद्येचे माहेरघर' असलेल्या अंबाजोगाईत कोचिंग क्लासेसची तपासणी कधी?
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channel‘विद्येचे माहेरघर’ असलेल्या अंबाजोगाईत कोचिंग क्लासेसची तपासणी कधी?
अंबाजोगाई: पुणे जिल्ह्यातील खेड (राजगुरुनगर) येथे दहावीच्या विद्यार्थ्याची त्याच्याच वर्गमित्राने कोचिंग क्लासमध्ये हत्या केल्याच्या धक्कादायक घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. या घटनेनंतर खेड प्रशासनाने तातडीने १८ क्लासेसची झाडाझडती घेत सुरक्षेचे वाभाडे काढले. मात्र, मराठवाड्यात शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंबाजोगाईत प्रशासन अजूनही सुस्त असल्याचे चित्र आहे. हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी येत असलेल्या या शहरात खासगी कोचिंग क्लासेसची तपासणी कधी होणार, असा सवाल आता पालकांमधून उपस्थित केला जात आहे.
अंबाजोगाई हे शिक्षणाचे मोठे केंद्र असल्याने बीड जिल्ह्यासह आजूबाजूच्या ग्रामीण भागातून हजारो विद्यार्थी-विद्यार्थिनी येथे शिक्षणासाठी येतात. शहरात गल्लीबोळात आणि अनेक ठिकाणी पत्र्याच्या शेड मधून दाटीवाटीने खासगी शिकवण्या सुरू आहेत. खेडमधील घटनेच्या पार्श्वभूमीवर तेथील शिक्षण विभागाने क्लासेसमधील अग्निशमन यंत्रणा, सीसीटीव्ही, स्वच्छतागृह आणि कर्मचारी वर्गाची चारित्र्य पडताळणी यासारख्या बाबींची कडक तपासणी केली. दुर्दैवाने, अंबाजोगाईत मात्र अशा प्रकारची कोणतीही मोहीम अद्याप हाती घेण्यात आलेली नाही. शहरातील अनेक क्लासेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, विद्यार्थ्यांच्या बसण्याची सुरक्षित व्यवस्था नाही आणि अग्निशमन यंत्रणेचा तर पत्ताच नाही.
विशेषतः मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरातील आनंद नगर भागात असलेल्या ट्यूशन एरियात यापूर्वी मुलींच्या छेडाछेडीच्या आणि विद्यार्थ्यातील मारहाणीच्या अनेक घटना घडल्या आहेत. तसेच अनेक क्लासेस हे पत्र्याच्या शेडमध्ये, तळघरात किंवा पहिल्या-दुसर्या मजल्यावर भरतात, जिथे आपत्कालीन बाहेर पडण्याचा मार्गही (Emergency Exit) उपलब्ध नाही. शिकवणारे शिक्षक आणि तेथे काम करणारे इतर कर्मचारी यांची पार्श्वभूमी किंवा चारित्र्य पडताळणी केली जात नाही. त्रुटींमुळे अंबाजोगाईतही गंभीर परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे प्रशासनाने एखादी दुर्घटना घडण्याची वाट न पाहता शहरात आणि परिसरात असलेल्या सर्व खासगी कोचिंग क्लासेसचे ‘सेफ्टी ऑडिट’ करणे अत्यंत गरजेचे झाले आहे.
विद्यार्थ्यांच्या जीविताशी खेळणाऱ्या आणि सुरक्षा मानकांचे उल्लंघन करणाऱ्या क्लास चालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. अंबाजोगाईचे गटशिक्षणाधिकारी आणि पोलीस प्रशासन याबाबतीत तत्परता दाखवणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. पालकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी तातडीने तपासणी मोहीम राबवून त्रुटी आढळून आल्यास कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.