Breaking

‘रुग्णांच्या चष्म्यातून’ च्या इंग्रजी अनुवादित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा ७ डिसेंबरला

Updated: डिसेंबर 5, 2025

By Vivek Sindhu

'रुग्णांच्या चष्म्यातून' च्या इंग्रजी अनुवादित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा ७ डिसेंबरला

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

छत्रपती संभाजीनगर: प्रख्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉ. शुभदा राठी लोहिया लिखित ‘रुग्णांच्या चष्म्यातून’ (मराठी) या पुस्तकाचे डॉ. काजल मुंदडा अनुवादित इंग्रजी रूपांतर ‘अनव्हिलींग हिलींग’चा प्रकाशन समारंभ येत्या ७ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे. डॉक्टर-रुग्ण यांच्यातील विलक्षण नातेसंबंधांवर आधारित ही पुस्तके असून, सायंकाळी ५ वाजता स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्था सभागृह, स्वातंत्र्य सैनिक कॉलनी, छत्रपती संभाजीनगर येथे हा सोहळा पार पडेल.

या महत्त्वपूर्ण प्रकाशन सोहळ्याला प्रमुख पाहुण्या म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या औषधवैद्यक शास्त्र विभागाच्या माजी प्राध्यापक व विभाग प्रमुख तसेच जेरियाट्रिक्स विभाग, कमलनयन बजाज हॉस्पिटल येथील ख्यातनाम डॉ. मंगला बोरकर यांची उपस्थिती असणार आहे. डॉ. बोरकर यांच्या हस्ते या दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन केले जाईल.

प्रकाशन झालेल्या पुस्तकांवर सखोल भाष्य करण्यासाठी शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर येथील सहयोगी प्राध्यापक डॉ. शिरीष खेडगीकर हे उपस्थित राहणार आहेत. ‘रुग्णांच्या चष्म्यातून’ या पुस्तकातून लेखिका डॉ. शुभदा राठी लोहिया यांनी रुग्णाच्या दृष्टिकोनातून वैद्यकीय अनुभव आणि उपचारांची मांडणी केली आहे. ‘अनव्हिलींग हिलींग : द युनिक डॉक्टर पेशंट रिलेशनशीप’ या नावाने डॉ. काजल मुंदडा यांनी त्याचे इंग्रजीमध्ये भाषांतर केले आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. शुभदा राठी लोहिया, डॉ. काजल भंडारी मुंदडा, प्रा. रामेश्वर राठी आणि सुश्री कमला राठी यांनी परिश्रम घेतले असून, त्यांनी सर्व साहित्यप्रेमी आणि नागरिकांना या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. ही पुस्तके वैद्यकीय क्षेत्रातील संवाद आणि विश्वास अधिक दृढ करण्यास मदत करतील अशी अपेक्षा आहे.


Categories

Recent Posts