Breaking

नंदकिशोर मुंदडा यांच्या विजयासाठी सुनबाई सरसावल्या!

Updated: नोव्हेंबर 22, 2025

By Vivek Sindhu

नंदकिशोर मुंदडा यांच्या विजयासाठी आमदार सुनबाई सरसावल्या!

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

आ. नमिता मुंदडा यांच्या दमदार प्रचार फेऱ्यांनी निवडणुकीची समीकरणे बदलली

अंबाजोगाई – शहर परिवर्तन जनविकास आघाडीकडून नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात उतरलेले नंदकिशोर मुंदडा हे ४७ वर्षांच्या राजकीय प्रवासात प्रथमच प्रत्यक्ष निवडणूक लढवत आहेत. प्रचंड जनसंपर्क, नागरिकांसाठी दिवसाचे २४ तास उपलब्ध राहणारी कार्यशैली आणि शहराच्या विकासातील त्यांच्या योगदानाची दखल घेत त्यांना मतदारांचे मोठे समर्थन मिळत आहे.  दरम्यान, नंदकिशोर मुंदडा यांच्या विजयासाठी त्यांच्या सुनबाई तथा आमदार नमिता मुंदडा या सरसावल्या असून जनविकास आघाडीच्या सर्व ३१ उमेदवारांच्या प्रचाराचा भार त्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतला आहे. नागरिकांशी जिव्हाळ्याचा संवाद आणि अथक प्रचारयात्रेमुळे आ. नमिता मुंदडा यांचा प्रचार प्रभावी ठरत असून जनविकास आघाडीला शहरभर व्यापक पाठिंबा मिळत असल्याचे चित्र स्पष्ट दिसू लागले आहे.

आत्तापर्यंत त्यांनी प्रभाग ३, ९, १२, १५ मध्ये भव्य प्रचार रॅली घेतल्या तर प्रभाग ४, ६, ७, १०, १४ या ठिकाणी कॉर्नर बैठका पार पाडल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून महिला, युवक आणि ज्येष्ठ मतदार त्यांच्याभोवती मोठ्या संख्येने गोळा होत आहेत. मोठ्या पदावर असूनही साधी राहणी, सहज लोकांमध्ये मिसळण्याचा गुण आणि प्रत्येक मतदाराशी असलेली नाळ यामुळे त्या शहरात लोकप्रिय आहेत. सासूबाई, माजी मंत्री स्व. विमलताई मुंदडा यांच्या साधेपणाची आणि जनसेवेची परंपरा त्यांनी पुढे नेली आहे.

नमिता मुंदडा या आपल्या भाषणांमधून मागील काही वर्षांत नंदकिशोर मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या विकासकामांचा आढावा नागरिकांसमोर ठेवतात. शहरातील सर्वत्र झालेले सिमेंट काँक्रीट रस्ते, उद्याने, देवस्थाने आणि प्राचीन स्थळांचा विकास, विविध समाजांच्या स्मशानभूमीची उभारणी, तसेच शहरासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या २०६ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेची प्रगती याचा आढावा त्या नागरिकांसमोर ठेवतात. अनेक प्रकल्प पूर्ण झाले असून उर्वरित कामे जलद गतीने सुरू असल्याचे त्या नागरिकांना पटवून सांगतात. यापूर्वी विकासकामे करताना नगरपालिकेच्या माध्यमातून विरोधकांनी केलेली आडकाठी  लक्षात घेता प्रगतीपथावर असलेली आणि प्रस्तावित विकासकामे पूर्ण करण्यासाठी शहराला नंदकिशोर मुंदडा यांच्यासारख्या सशक्त आणि विकासाची दृष्टी असलेल्या नेतृत्वाची गरज असल्याचे त्या पटवून सांगतात. त्यांचा हा प्रचार अतिशय प्रभावी ठरत असून वाढत्या पाठींब्यामुळे या निवडणुकीत नंदकिशोर मुंदडा आणि शहर परिवर्तन जनविकास आघाडीच्या सर्व ३१ उमेदवारांची बाजू दिवसेंदिवस अधिक मजबूत होत असल्याचे दिसते आहे.

घरकुल योजनेतून निर्माण झाले आपुलकीचे नाते

आ. नमिता मुंदडा यांच्या पाठपुराव्यामुळे अनेक गोरगरिबांना घरकुलाच्या शासकीय योजनेचा लाभ मिळाला आहे. हक्काचे घर मिळाल्याने नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल आत्मीयता वाढली आहे. त्यामुळे अनेक वृद्ध महिला, कुटुंबीय प्रचारावेळी त्यांच्या जवळ अश्रूंनी कृतज्ञता व्यक्त करताना दिसतात. या भावनिक जोडणीच्या परिणामाने जनविकास आघाडीच्या प्रचाराला वेग दिला आहे. 


Categories

Recent Posts