Breaking
Updated: नोव्हेंबर 5, 2025
शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट यांचे आवाहन
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelशेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट यांचे आवाहन
अंबाजोगाई (जि. बीड): शेतकरी आत्महत्यांचा कलंक पुसण्यासाठी मोदी सरकारने कुठलीही ठोस उपाययोजना केली नाही.विदेशातून शेतीमालाची आयात करुन शेतीमालाचे भाव पाडले जात आहेत.उत्पादन वाढीसाठी जी.एम. तंत्रज्ञानाला बंदी घातली आहे. उत्पादन वाढीच्या नावाखाली शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याने सिरसाळा ता.परळी येथे केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थितीत होणाऱ्या शेतकरी संवाद मेळाव्यात शेतकऱ्यांनी सहभागी होवू नये, कार्यक्रमावर बहिष्कार घालावा असे आवाहन शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष तथा भारतीय किसान संघ-परिसंघ नवी दिल्लीचे सचिव कालिदास आपेट यांनी केले आहे.
मोदी सरकारचे कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान हे मध्यप्रदेशचे सलग वीस वर्ष मुख्यमंत्री होते.मध्यप्रदेशातील शेतमजूर दरवर्षी ऊस तोडणी, सोयाबीन काढणी आणि कापूस वेचणीसाठी लाखोंच्या संख्येने महाराष्ट्रात येतात. मध्यप्रदेशातील शेतमजुरांना रोजगाराची व्यवस्था त्यांना करता आलेली नाही.संतोष देशमुख खून प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराडच्या निगराणीखाली राज्याच्या तत्कालीन कृषीमंत्र्यांनी परळी वैजनाथ येथे कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले होते. तेंव्हा कौडगाव घोडा येथील अनिल कांडके आणि लोणी येथील धनंजय राऊत या शेतकऱ्यांनीअतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाल्याने आत्महत्या केल्या. त्याकडे दुर्लक्ष करून केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन केले होते. त्याच काळात गणेश उत्सवात धनंजय मुंडे यांनी नट-नट्यावर कोट्यावधी रुपये उधळले होते.दिल्लीला परत जाताच शिवराजसिंह चौहान यांनी महाराष्ट्रातील पीक विमा योजनेत बदल करून वैयक्तिक पिक विमा नुकसान भरपाई मिळविण्याचे ट्रिगर बदलण्यास मंजुरी दिली.यावर्षी सलग पडलेल्या अतिपावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. मात्र पिक विमा योजनेतील बदलामुळे शेतकऱ्यांना कसलाही फायदा होणार नाही.अशी
शेतकरी विरोधी धोरणे राबविणाऱ्या शिवराजसिंह चौहान यांच्या शेतकरी संवाद मेळाव्याला जाऊन आपल्या पदरात काय पडणार आहे? याचा विचार शेतकऱ्यांनी करावा.
ग्लोबल विकास ट्रस्टसारख्या स्वयंसेवी संस्थांच्या कामामुळे शेतकऱ्यांचा फायदा झाल्याची नोंद शेतकरी आत्महत्येवरील कुठल्याही अहवालात नाही.जी.व्ही.टी. ने वाटप केलेल्या फळ पिकांना विशेषतः सिताफळांच्या रोपांना तीन वर्षे उलटून सुध्दा फळधारणा झाली नाही. सीताफळीच्या बागा शेतकऱ्यांना उपटून काढाव्या लागल्या, सिरसाळा परिसरात तशा तक्रारी आहेत.यावर्षी बीड जिल्ह्यात आतापर्यंत राजेभाऊ शेप आणि सुर्यकांत शेप यासह सुमारे 300 शेतकऱ्यांनी आत्म(हत्या) करून मृत्यूला कवटाळले आहे.शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी शरद जोशी यांच्या टास्क फोर्सने तसेच डॉ.स्वामीनाथन समितीने केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी न करता तथाकथित स्वयंसेवी संस्थेच्या आडून शेतकऱ्यांना 200 कोटी रुपयांचे केळी आणि रेशीम शेतीसाठी कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखविण्यात येत आहे. या प्रकाराची चौकशी करावी.
यावर्षी अति पावसाने जमिनी खरडून गेल्या आहेत, पशुधनाचे अतोनात नुकसान झाले आहे. मुला बाळांची शैक्षणिक फीस,दवाखाना, रब्बीच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत. देवेंद्र सरकारने घोषित केलेली मदत अनेकांना मिळालेली नाही. कांदा,भाजीपाला,केळी, दुधाचे दर कमालीचे घसरले आहेत. सोयाबीन, कापूस, तूर,उडीद, मूग, ज्वारी, बाजरी, मका आदी. पिकांना बाजार समितीत आधारभूत किंमत मिळत नाही.याकडे दुर्लक्ष करून बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन शेतकरी संवाद मेळाव्यासाठी गर्दी गोळा करीत आहेत.याचा शेतकऱ्यांनी निषेध करावा.
शेतीमालावरील निर्यातबंदी तातडीने हटवावी, जनुकीय परावर्तित बियाणे (जी.एम.) वापरण्यास परवानगी द्यावी, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमुक्ती करावी.गेल्यावर्षी घातलेल्या ऊसाचे थकलेले हजारो कोटी रुपये आर. एस.एफ.च्या कायद्याप्रमाणे मिळवून द्यावेत. दुधातील भेसळ थांबवावी, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करावी. शेतीमालाच्या उत्पादन वाढीसाठीची दिशाभूल थांबवावी.शेतकऱ्यांना पुन्हा पुन्हा कर्जबाजारी करू नये.असे आवाहन कालिदास आपेट यांनी केले आहे.