Breaking
Updated: ऑक्टोबर 31, 2025
दिवाळीत गरिबांचा 'आनंदाचा शिधा' हरवला, साखर वाटपही बंद
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई : यंदाच्या दिवाळीत शिधापात्र कुटुंबांचा ‘आनंदाचा शिधा’ हिरावला असून, सणासुदीच्या काळात गोडव्यालाही तडा गेला आहे. सार्वजनिक वितरण प्रणालीतून (राशन दुकानांद्वारे) मिळणाऱ्या शिध्यात गेल्या काही महिन्यांपासून साखरेचे वाटप पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे दिवाळीच्या ताटातला गोडवा हरपल्याची भावना लाभार्थ्यांकडून व्यक्त होत आहे.
सध्याच्या शिधा वितरणानुसार प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना फक्त ३ किलो तांदूळ आणि २ किलो गहू, तर अंत्योदय लाभार्थ्यांना १५ किलो गहू व २० किलो तांदुळ इतकाच शिधा मिळत आहे. मात्र साखर वाटप बंद असल्याने गरीब कुटुंबांना सणासुदीचा गोडवा अनुभवता आलेला नाही. या शिवाय मागील चार महिन्यांपासून रास्त भाव कमिशन न मिळाल्याने तेही आर्थिक अडचणीत आले आहेत. शासनाच्या उदासीन धोरणामुळे लाभार्थी आणि दुकानदार दोघेही हवालदिल झाले आहेत. मागील वर्षी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून ‘आनंदाचा शिघा किट’ वाटप करण्यात आले होते. त्यात १ किलो साखर, १ किलो तेल, अर्धा किलो पोहा, अर्धा किलो रवा, अर्धा किलो चनादाळ आणि अर्धा किलो मैदा यांचा समावेश होता. मात्र यंदा ही योजना थांबविण्यात आल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
दीड वर्षापासून साखर गायब
दीपोत्सवात प्रत्येक कुटुंबात मिष्ठान्न केले जाते. यावेळी स्वस्त धान्य दुकानातून मिळणारी साखर प्रत्येक कुटुंबाच्या आनंदात भर घालत असते. मात्र, गत दीड वर्षापासून रेशन दुकानातून साखर गायब झाली आहे. किमान दिवाळीला तरी साखर मिळेल, अशी ग्राहकांना अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात ग्राहकांच्या अपेक्षेवर पाणी फेरण्याचे काम झाले आहे. स्वस्त धान्य दुकानात २० रुपये किलो दराने मिळणारी साखर आता बाजारातून ४६ रुपये किलो दराने खरेदी करावी लागत आहे. आनंदाचा शिधा बंद झाल्याने अनेक लाभार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही धान्य किट देणे अपेक्षित होते, परंतु शासनाने आम्हाला या लाभापासून वंचित ठेवले. या निर्णयाचा मी तीव्र निषेध करतो आणि शासनाने गरीब लाभार्थ्यांचा विचार करून उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करतो. – रमेश कांबळे (लाभार्थी)
या वर्षी दिवाळीच्या सणासाठी शासनाने शिधापात्र लाभाथ्यांना धान्य किट (आनंदाचा शिघा किट) न दिल्याने जनतेमध्ये तिव्र नाराजी पसरली आहे. दिवाळी हा आनंद, ऐक्य आणि गोडव्याचा सण असतांना आनंदाचा शिधा किट मिळाली नसल्याने लाभार्थ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. – शाम सरवदे (जनसहयोग कार्यर्ते, मानवलोक)