Breaking

झाडे तोडल्याच्या वादातून तरुणासह वडिलांना दगडाने बेदम मारहाण; तिघांवर गुन्हा

Updated: जून 17, 2026

By Vivek Sindhu

झाडे तोडल्याच्या वादातून तरुणासह वडिलांना दगडाने बेदम मारहाण; तिघांवर गुन्हा

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड: तालुक्यातील आहेरवडगाव येथे झाडे तोडल्याची पोलीस तक्रार केल्याचा राग मनात धरून एका तरुणाला आणि त्यांच्या वडिलांना दगडाने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना १५ जून २०२६ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली असून, १६ जून रोजी सायंकाळी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आहेरवडगाव येथील रहिवासी हरीचंद्र गोरखनाथ घाडगे (वय ३६) यांनी आरोपींविरुद्ध झाडे तोडल्याची तक्रार दिली होती. याचाच राग धरून गावातील रामेश्वर भीमराव घाडगे, ज्ञानेश्वर भीमराव घाडगे आणि भीमराव देवराव घाडगे यांनी संगनमत करून हरीचंद्र यांना गाठले. ‘तुम्ही काल आमच्यावर केस का केली?’ असा जाब विचारत आरोपींनी त्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ सुरू केली. वाद वाढल्याने रामेश्वर घाडगे याने हरीचंद्र यांच्या डोक्यात आणि उजव्या हाताच्या पंजावर दगडाने प्रहार करून गंभीर जखमी केले. यावेळी हरीचंद्र यांचे वडील मध्यस्थी करण्यासाठी आले असता ज्ञानेश्वर याने त्यांच्या डाव्या पायाच्या गुडघ्यावर व कंबरेवर दगडाने मारून मुक्का मार दिला. तसेच तिसऱ्या आरोपीने लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा नोंदवला असून पोलीस हवालदार मुंडे पुढील तपास करत आहेत.


Categories

Recent Posts