Breaking

हुंड्यासाठी छळ करून विवाहितेला घराबाहेर हाकलले; अंबाजोगाईत पतीसह चौघांवर गुन्हा दाखल

Updated: जून 17, 2026

By Vivek Sindhu

हुंड्यासाठी छळ करून विवाहितेला घराबाहेर हाकलले; अंबाजोगाईत पतीसह चौघांवर गुन्हा दाखल

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई: लग्न ठरल्याप्रमाणे धुमधडाक्यात करूनही सासरच्या लोकांची हौस न फिटल्याने हुंड्यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याची धक्कादायक घटना अंबाजोगाईत समोर आली आहे. कपड्याचे दुकान टाकण्यासाठी माहेरून १० लाख रुपये आणण्याची मागणी करत विवाहितेला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून घराबाहेर हाकलून दिले आहे. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिमा आक्रम शेख (वय २२, रा. गुरुवार पेठ, अंबाजोगाई, ह.मु. फ्लावर्स क्वार्टर) हिने दिलेल्या फिर्यादीनुसार, तिचे लग्न २ फेब्रुवारी २०२५ रोजी आक्रम आस्लम शेख याच्यासोबत मुस्लिम रितीरिवाजाप्रमाणे झाले होते. लग्नात मुलीच्या नातेवाईकांनी १५ लाख रुपये खर्च केले होते. मात्र, लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यांतच सासरच्यांनी घरगुती फर्निचरसाठी दीड लाख रुपयांची मागणी करत सिमाचा छळ सुरू केला. तिच्या आई-भावाने तात्काळ एक लाख रुपये आणून दिले. तरीही सासरच्यांचे समाधान झाले नाही. पती आक्रम याने कपड्याचे दुकान सुरू करण्यासाठी माहेरून आणखी १० लाख रुपये आणण्याचा तगादा लावला. पैसे देण्यास नकार दिला असता पतीसह सासू रुक्कय्या आस्लम शेख, सासरे आस्लम शेख आणि दीर मुकरम आस्लम शेख यांनी तिला अमानुष वागणूक दिली, शिवीगाळ केली आणि घटस्फोट देण्याची धमकी दिली.

२९ मे २०२६ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास आरोपींनी सिमाला पैशासाठी मारहाण करत घरातून हाकलून दिले. अखेर तिने अंबाजोगाई येथील भरोसा सेलकडे दाद मागितली, मात्र तिथे तडजोड न झाल्याने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार रुक्मीन खंडू पाचपिंडे करत आहेत.


Categories

Recent Posts