Breaking
Updated: जून 17, 2026
परळीत साईबाबा मंदिराचे कुलूप तोडून २५ हजारांची दानपेटी लंपास
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelपरळी : परळी ते घाटनांदुर रस्त्यावरील चांदापूर शिवारात असलेल्या श्री साईबाबा मंदिराचे स्टील गेट आणि दानपेटीचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे २५ हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही चोरी १६ जून २०२६ रोजी मध्यरात्री साडेबारा ते पहाटे चार वाजेच्या दरम्यान झाली असून, याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विद्यानगर भागात राहणारे व्यापारी रवींद्र केशवराव गित्ते यांच्या खाजगी जागेत गट क्रमांक १४४ मध्ये हे श्री साईबाबांचे मंदिर आहे. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने मंदिराच्या मुख्य स्टील गेटचा कोंडा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर मंदिरातील गुप्तदान पेटीचे कुलूप तोडून त्यामध्ये भाविकांनी अर्पण केलेली अंदाजे २५ हजार रुपयांची रोख रक्कम चोरून चोरटा पसार झाला. १६ जून रोजी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर रवींद्र गित्ते यांनी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ आणि ३३१ (४) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. धार्मिक स्थळावरील या चोरीच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस उपनिरीक्षक सारुळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.