Breaking
Updated: जून 17, 2026
सोने लखलखीत करून देण्याच्या बहाण्याने ७५ वर्षीय वृद्धेची फसवणूक
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelगेवराई: पावडरने सोने चमकावून लखलखीत करून देतो, असे आमिष दाखवून दोन अज्ञात भामट्यांनी एका ७५ वर्षीय वृद्धेचे १८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केल्याची धक्कादायक घटना गेवराई तालुक्यातील गडी येथे घडली आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रशीदाबेगम ईस्माईल शेख (वय ७५, रा. मशीद जवळ, गडी, ता. गेवराई) यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. रशीदाबेगम या त्यांचे ८० वर्षीय पती ईस्माईल यांच्यासोबत गडी येथे राहतात. १६ जून २०२६ रोजी दुपारी १२ ते दीड वाजण्याच्या सुमारास दोन तरुण त्यांच्या घरासमोर मोटारसायकल लावून आत आले. त्यापैकी एका तरुणाने निळ्या रंगाचा शर्ट आणि पायात बूट घातलेले होते. ‘आमच्या जवळील पावडरने तुमचे सोने चमकावून लखलखीत करून देतो,’ असे त्यांनी रशीदाबेगम यांना सांगितले.
त्यांच्या बोलण्याला भुलून वृद्धेने गळ्यातील १६ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत आणि कानातील २ ग्रॅम वजनाची दोन फुले असे एकूण १८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने काढले. पती वयस्कर असल्याने त्यांना ऐकू येत नाही आणि फिर्यादी वृद्धेला नीट चालता येत नाही, याचाच फायदा या भामट्यांनी घेतला. त्यांनी १०,८०० रुपये मूल्याचे सोन्याचे दागिने हातोहात काढून घेतले आणि आणलेली पांढरी पावडर तिथेच ठेवून पळ काढला. वृद्धेने आरडाओरडा केल्यावर शेजारील मुलगा समीर फेरोज शेख याने आरोपींचा पाठलाग केला, मात्र ते हाती लागले नाहीत. याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात अज्ञात दोन इसमांविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार रवींद्र दशरथ राऊत करत आहेत.