Breaking
Updated: जानेवारी 25, 2026
जिथे शिष्टाचार, सदाचार तिथे भगवंताचा साक्षात्कार - भागवताचार्य पूज्य श्री.रमाकांतजी व्यास
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई (प्रतिनिधी) – येथील दासोपंत संशोधन मंडळ, अंबाजोगाई यांच्या वतीने दिगंबरानुचर उपाख्य सर्वज्ञ दासोपंत विरचित ग्रंथराज (मराठी ओवी-गद्य अनुवाद-अर्थ) या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा शुक्रवारी भागवताचार्य पूज्य श्री.रमाकांतजी व्यास, आमदार सौ.नमिताताई मुंदडा यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. या ग्रंथ प्रकाशन सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवरांसह अंबाजोगाई शहर व परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.
दासोपंत संशोधन मंडळ, अंबाजोगाई यांच्या वतीने दिगंबरानुचर उपाख्य सर्वज्ञ दासोपंत विरचित ग्रंथराज (मराठी ओवी-गद्य अनुवाद-अर्थ) या ग्रंथाचे प्रकाशन मा.पूज्य श्री.रमाकांतजी व्यास (भागवताचार्य) यांच्या शुभ हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत शुक्रवार, दि.२३ जानेवारी २०२६ रोजी दासोपंत संशोधन मंडळ, देवघर परिसर, देशपांडे गल्ली, अंबाजोगाई या ठिकाणी करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ष.ब्र.१०८ श्री.शंभूलिंग शिवाचार्य महाराज (मठ संस्थान, अंबाजोगाई) हे होते, तर यावेळी व्यासपीठावर आ.सौ.नमिता अक्षय मुंदडा (विधानसभा सदस्य, महाराष्ट्र राज्य.), नंदकिशोर मुंदडा (अध्यक्ष, नगरपरिषद, अंबाजोगाई.), सौ.पद्मश्री धर्माधिकारी (अध्यक्षा, नगरपरिषद, परळी वैजनाथ), ऍड.विष्णु कऱ्हाड (दत्तभक्त व दत्त साहित्य अभ्यासक), गदाधरबुवा रामदासी (मठाधिपती, राममंदिर, भटगल्ली, अंबाजोगाई), कृष्णाबुवा रामदासी (मठाधिपती, राममंदिर, खडकपुरा, अंबाजोगाई), गिरधारीलालजी भराडिया (सचिव, योगेश्वरी देवल कमिटी, अंबाजोगाई), उध्दवबापु आपेगावकर (आंतरराष्ट्रीय पखवाजवादक), दासोपंत संशोधन मंडळ, अंबाजोगाईचे अध्यक्ष अरूण देशपांडे (हरबाजी), उपाध्यक्ष दासोपंत गोस्वामी, सचिव ऍड.दत्तप्रसाद रांदड, विष्णुकुमार देशपांडे (मा.संचालक – म.रा.वि.मं.निर्मिती व गद्य लेखक), जितेंद्र देशपांडे (प्रकल्प संपादक, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई) आणि सुनिल दीक्षित (उपाध्याय, देवघर, अंबाजोगाई) हे मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी वेदशाळेतील उपासकांकडून मंत्रोच्चार वेदपठण करण्यात आले. त्यानंतर दासोपंत संशोधन मंडळ, अंबाजोगाई यांच्याकडून व्यासपीठावरील मान्यवरांसह नवनिर्वाचित नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा (नगरपरिषद, अंबाजोगाई.), नगराध्यक्षा सौ.पद्मश्री धर्माधिकारी (नगरपरिषद, परळी वैजनाथ), नगरसेवक महेश लोमटे, नगरसेवक रचना परदेशी, नगरसेवक किरण भालेकर, नगरसेवक गणेश देशमुख यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी आशीर्वचनपर मनोगत व्यक्त करताना मा.पूज्य श्री.रमाकांतजी व्यास (भागवताचार्य) यांनी मनुष्याला संसारात सुखी होण्यासाठी भक्तीची आवश्यकता आहे. सुखी कशा प्रकारे होता येईल याबाबत बोलताना ते म्हणाले की, भक्तीची कास धरली पाहिजे, आपल्यापासून कोणाला त्रास होऊ नये, मनोवृत्ती विधायक हवी, भगवान श्रीराम यांच्या सद्गुणांचा जीवनात अंगीकार करावा, जीवनाला परमार्थ, भक्ती व अध्यात्माचा स्पर्श हवा. मन, अंतःकरण शुद्ध व पवित्र ठेवा, ज्ञान साधना करा, परमार्थात कशी वाटचाल करावी, आपल्याकडील संपत्तीचा उपयोग समाजातील दीनदुबळ्यांच्या मदतीसाठी करावा, संतांना शरण जा, अंतःकरणात भाव ठेवा, भागवत कथा ऐकून समाज परिवर्तन होत आहे. सर्वज्ञ दासोपंत यांनी ग्रंथराज ग्रंथातून वेदान्त वा अद्वैतशास्त्र आकलनासाठी आठ प्रकरणे गुरू-शिष्य संवाद रूपाने उपयोजिली आहेत हा ग्रंथ शिष्य, साधक व मुमुक्षुंसाठी शब्दरूपी, तत्वरूपी गुरूप्रसाद आहे. ग्रंथराज ग्रंथ म्हणजे अध्यात्मिक कल्याणाचा दिपस्तंभ आहे असे मा.पूज्य श्री.रमाकांतजी व्यास (भागवताचार्य) यांनी सांगितले. सुरूवातीला प्रास्ताविक करताना दासोपंत संशोधन मंडळ, अंबाजोगाईचे अध्यक्ष अरूण देशपांडे (हरबाजी) यांनी सांगितले की, दासोपंत संशोधन मंडळ ही शासनमान्य संस्था असून ती १९८६ साली स्थापन करण्यात आली. दासोपंत जीवनदृष्टी प्रबोधित करण्यासाठी समर्पित आहे. दासोपंतांच्या साहित्याचा प्रचार व प्रसार हा या संस्थेचा प्रमुख हेतू आहे. दासोपंतांच्या साहित्य संशोधनाचा, तत्त्वज्ञानाचा अभ्यास हे या संस्थेचे सैद्धांतिक अंग आहे. या संस्थेला संत, महंत, विचारवंत, व्यासंगी अभ्यासक यांचा आशीर्वाद व सातत्याने मार्गदर्शन लाभत आहे. तत्कालीन मंत्री जयदत्त आण्णा क्षीरसागर व माजी आमदार पृथ्वीराज साठे यांच्या माध्यमातून मंडळास ३० लक्ष रूपये निधी उपलब्ध झाला आहे. मंडळाचे कार्य हे लोक सहभागातून चालते. दासोपंतकृत ग्रंथराज हा ग्रंथ आकलनासाठी मराठी ओवी-गद्य अनुवाद-अर्थ यांचे संपादन होणे गरजेचे होते. याकामी लेखक विष्णुकुमार देशपांडे, जितेंद्र देशपांडे यांचे परिश्रम मोलाचे आहेत असे अध्यक्ष अरूण देशपांडे (हरबाजी) म्हणाले. त्यानंतर मठाधिपती गदाधरबुवा रामदासी, ऍड.कऱ्हाड, नगरसेविका रचना परदेशी यांनी समायोचित मनोगत व्यक्त केले. तर यावेळी बोलताना लेखक विष्णुकुमार देशपांडे यांनी सांगितले की, ग्रंथराज (मराठी ओवी-गद्य अनुवाद-अर्थ) हा ग्रंथ गुरू – शिष्याचा संवाद आहे. यात एकूण ८ प्रकरणे आहेत. अद्वैतशास्त्र हा मुख्य विषय आहे. दासबोधाची पुर्व आवृत्ती आहे. दासोपंतांचे प्रकांड पांडित्य, अफाट साहित्य, रचना वैशिष्ट्य याबाबत माहिती दिली. या ग्रंथाचा गद्य अनुवाद, निर्मिती संदर्भात अनुभव कथन केले. याप्रसंगी ग्रंथराज ग्रंथातील संशोधनाबाबत व दासोपंत संशोधन मंडळाच्या संशोधन कार्या सोबत दासोपंतांच्या कार्याची माहिती दासोपंत अध्यासन केंद्राचे प्रमुख जितेंद्र देशपांडे यांनी नेमक्या शब्दांत देवून आपली भूमिका मांडली. अध्यक्षीय समारोप करताना ष.ब्र.१०८ श्री.शंभूलिंग शिवाचार्य महाराज यांनी दासोपंतांचे साहित्य हे आजही दिशादर्शक आहे. दासोपंतांनी विपुल लेखन केले. दासोपंतांच्या साहित्याचे संशोधन, साहित्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी दासोपंत संशोधन मंडळाचे सुरू असलेले कार्य कौतुकास्पद आहे असे शिवाचार्य महाराज म्हणाले. ग्रंथ प्रकाशन सोहळ्याचे सुत्रसंचालन प्रा.गणेश पिंगळे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार सचिव ऍड.दत्तप्रसाद रांदड यांनी मानले. ग्रंथ प्रकाशन सोहळ्यास माजी नायब तहसीलदार शंकर बुरांडे, दीनदयाळ बँकेचे संचालक मकरंद सोनेसांगवीकर, प्रा.श्रीनाथ तिवारी, गायक आसाराम जोशी, रामेश्वर रांदड, शंतनु हिरळकर, पद्माकर सेलमुकर, मुकुंद घाटे, डॉ.गोपाळ चौसाळकर, डॉ.रत्नाकर देशपांडे, मधुकर बाभुळगावकर, प्रा.राम चौधरी धर्मापुरीकर, शरद देशपांडे, अनिरूद्ध चौसाळकर, पद्मनाभ देशपांडे यांच्यासह अंबाजोगाई शहर व परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी दासोपंत संशोधन मंडळ, अंबाजोगाईचे अध्यक्ष अरूण देशपांडे (हरबाजी), उपाध्यक्ष दासोपंत गोस्वामी, सचिव ऍड.दत्तप्रसाद रांदड, सहसचिव लक्ष्मीकांत गोस्वामी, कोषाध्यक्ष उपेंद्र गोस्वामी, विश्वस्त – दत्तप्रसाद गोस्वामी, कमलाकर देशपांडे, राहुल देशपांडे, जितेंद्र देशपांडे, सौ.दिपाली देशपांडे, सौ.अंजली सेलुकर यांनी पुढाकार घेतला. ग्रंथ प्रकाशन सोहळ्याच्या ठिकाणी दासोपंत संशोधन मंडळ, अंबाजोगाई यांनी संपादित केलेले, अनुवादीत, संत सर्वज्ञ दासोपंत रचित ग्रंथ संपदा, दिनदर्शिका ही शिष्य, साधक व मुमुक्षुंसाठी उपलब्ध करून देण्यात आली होती.
ग्रंथप्रेमी अंबाजोगाईसाठी अभिमानाचा क्षण :
अंबाजोगाई येथील दासोपंत संशोधन मंडळ येथे आयोजित दिगंबर उपाख्य सर्वज्ञ दासोपंत विरचित ग्रंथराज (मराठी ओवी–गद्य अनुवाद व अर्थ) या मौलिक ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहिले. मराठी संतसाहित्य, दत्तपरंपरा आणि आध्यात्मिक विचारधारा यांचा अमूल्य ठेवा असलेला हा ग्रंथ सर्वसामान्य वाचकांपर्यंत सुलभ भाषेत पोहोचावा, या उद्देशाने करण्यात आलेला हा मराठी ओवी–गद्य अनुवाद निश्चितच अभ्यासक, साधक आणि ग्रंथप्रेमींसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. संत दासोपंतांच्या विचारविश्वाचा आशय, तत्त्वज्ञान आणि आध्यात्मिक संदेश आजच्या पिढीपर्यंत पोहचविण्यासाठी हा ग्रंथ निश्चित योगदान देईल असा विश्वास यानिमित्ताने व्यक्त केला. या ग्रंथनिर्मितीमागे योगदान देणाऱ्या सर्व अभ्यासकांचे व आयोजकांचे अभिनंदन. या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने मान्यवरांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. अशा संशोधनात्मक, सांस्कृतिक व आध्यात्मिक उपक्रमांमुळे अंबाजोगाईची वैचारिक व सांस्कृतिक परंपरा अधिक समृद्ध होत असून, दासोपंत संशोधन मंडळाचे हे कार्य निश्चितच प्रेरणादायी आहे.
~ सौ.नमिता अक्षय मुंदडा
(आमदार, केज विधानसभा मतदारसंघ, बीड.)