Breaking

रस्त्याच्या वादातून सख्ख्या भावासह तिघांची कोयत्याने मारहाण

Updated: जून 6, 2026

By Vivek Sindhu

रस्त्याच्या वादातून सख्ख्या भावासह तिघांची कोयत्याने मारहाण

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील उमापूर येथे शेतात जाण्याच्या रस्त्याचा जुना वाद उफाळून आला असून, सख्ख्या भावासह तिघांनी एका शेतकऱ्यावर कोयता आणि कुऱ्हाडीच्या दांड्याने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. २० मे २०२६ रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली असून, याप्रकरणी ५ जून रोजी चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवनाथ बळीराम पोकळे (वय ४५, रा. उमापूर) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव असून त्यांनी पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली आहे.

फिर्यादीनुसार, नवनाथ पोकळे हे गावात असताना त्यांचे सख्खे भाऊ राजेंद्र बळीराम पोकळे, पुतण्या अनिल राजेंद्र पोकळे आणि भावजय शोभा राजेंद्र पोकळे यांनी शेतात जाण्याचा रस्ता का अडवला, अशी विचारणा करत वाद सुरू केला. या वादाचे पर्यावसान पुढे बेदम मारहाणीत झाले. तिन्ही आरोपींनी संगणमत करून नवनाथ यांच्यावर कोयत्याने आणि कुऱ्हाडीच्या दांड्याने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या डाव्या हातावर आणि पाठीवर गंभीर दुखापत झाली आहे. आरोपींनी फिर्यादीला अश्लील शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. जखमीवर उपचार सुरू असल्याने तक्रार देण्यास उशीर झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चकलांबा पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८ (१), ११५(२), ३५२, ३५१ (२), ३५१ (३) आणि ३ (५) अन्वये गुन्हा नोंदवला असून पोलीस अंमलदार पवार पुढील तपास करत आहेत.


Categories

Recent Posts