Breaking
Updated: जून 6, 2026
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबीड: जिल्ह्यातील नेकनूर पोलीस ठाण्याच्या आवारातच शनिवारी दुपारी जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने एक मोठी धडक कारवाई केली. अपघाताच्या विम्याच्या कागदपत्रांसाठी तक्रारदाराकडे १० हजार रुपयांची लाच मागणारा वादग्रस्त पोलीस अंमलदार दत्तात्रय बळवंत याला एसीबीच्या पथकाने रंगेहात बेड्या ठोकल्या. काही महिन्यांपूर्वी एका तरुणाला ‘तुझे कॅरॅक्टर खराब करीन’ अशी उघड धमकी देणारा हा पोलीस स्वतःच लाचखोरीच्या चिखलात अडकल्याने बीड जिल्हा पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षकच जेव्हा अशा प्रकारे सामान्य नागरिकांची अडवणूक करून लाच मागतात, तेव्हा खाकी वर्दीच्या विश्वासार्हतेवरच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होते.
काही दिवसांपूर्वी येळंबघाट परिसरात तक्रारदार यांच्या एका नातेवाइकाच्या वाहनाचा भीषण अपघात झाला होता. या अपघाताचा कायदेशीर विमा मिळवण्यासाठी आवश्यक असलेली शासकीय कागदपत्रे आणि पंचनामा देण्यासाठी अंमलदार दत्तात्रय बळवंत याने १० हजार रुपयांची मागणी केली होती. शासकीय कर्तव्य बजावण्यासाठी चक्क लाचेची मागणी होत असल्याने संतप्त झालेल्या तक्रारदाराने थेट जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेऊन रीतसर तक्रार नोंदवली.
तक्रार मिळताच एसीबीचे उपअधीक्षक बाळासाहेब जाधवर यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथकाने शनिवारी दुपारी नेकनूर पोलीस ठाण्याच्या परिसरात अत्यंत गुप्तपणे सापळा रचला. ठरलेल्या नियोजनानुसार, तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाचेची रोकड स्वीकारत असताना दबा धरून बसलेल्या पथकाने अंमलदार दत्तात्रय बळवंत याला जाळ्यात ओढले आणि पोलीस ठाण्याच्या आवारातच त्याला रंगेहात अटक केली. या कारवाईमुळे लाचखोर पोलिसांचे धाबे दणाणले असून आरोपी बळवंत याच्याविरुद्ध नेकनूर पोलीस ठाण्यातच गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
लाचेच्या जाळ्यात अडकलेला अंमलदार दत्तात्रय बळवंत हा त्याच्या उद्धट आणि वादग्रस्त वर्तणुकीसाठी आधीपासूनच कुप्रसिद्ध होता. काही महिन्यांपूर्वी शेतीच्या वादातून एका निष्पाप शेतकरी पुत्राला ‘तुझे कॅरॅक्टर खराब करून टाकीन, गुन्हे दाखल करून भविष्य उद्ध्वस्त करीन’ अशी धमकी देणारा बळवंतचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. आज तोच पोलीस स्वतः लाच घेताना पकडला गेल्याने त्याचे स्वतःचेच ‘कॅरॅक्टर’ खराब झाले आहे. सामान्य नागरिकांवर कायद्याचा धाक दाखवून खिसे गरम करणाऱ्या अशा लाचखोर प्रवृत्तीला एसीबीने दाखवलेला इंगा अत्यंत कौतुकास्पद ठरत असून नेटकऱ्यांनी त्याचा जुना व्हिडिओ पुन्हा शेअर करत या लाचखोराची जोरदार पोलखोल सुरू केली आहे.