Breaking
Updated: जून 6, 2026
शासकीय नोकरीचे आमिष दाखवून अंबाजोगाईच्या तरुणाची चार लाखांची फसवणूक
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई: अंबाजोगाई येथे जिल्हाधिकारी कार्यालयात वैयक्तिक सहाय्यक (पीए) पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका २४ वर्षीय सुशिक्षित बेरोजगार तरुणाची चार लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात काजल देविदास भट्ट नामक महिलेविरुद्धफसवंचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी महिलेने स्वतःला महसूल विभागातील अधिकारी असल्याचे भासवून हा संपूर्ण डाव रचला होता. बनावट नियुक्ती आदेश हाता पडल्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणाने पोलिसांत धाव घेतली आहे. विशेष म्हणेज अंबाजोगाईच्या अपर जिल्हाधिकारी आणि बीडचे जिल्हाधिकारी यांना पैसे द्यावयाचे आहेत असे सांगून त्या महिलेने तरुणाकडून रक्कम उकळली.
या घटनेतील फिर्यादी ओमकार संतोष शिंदे (वय २४, रा. अमृतेश्वरनगर, अंबाजोगाई) हा तरुण सुशिक्षित असून स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. संशयित महिला आरोपी काजल देविदास भट्ट (रा. मारवाडगल्ली, नानज, ता. जामखेड) ही फिर्यादीच्या मामीच्या घरी भाड्याने राहत होती. तिने स्वतःला अंबाजोगाई येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात सहाय्यक महसूल अधिकारी म्हणून कार्यरत असल्याचे सांगितले होते. काही दिवसांपूर्वी काजलने फिर्यादीच्या मामीला गाठून बीड जिल्हाधिकारी कार्यालयात वैयक्तिक सहाय्यक पदाच्या तीन जागा रिक्त असल्याचे सांगितले. आपले वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आणि जिल्हाधिकाऱ्यांशी चांगले संबंध असल्याचे सांगून तिने ओमकारला नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. या पदासाठी ४५ हजार रुपये पगार आणि प्रवास भत्ता मिळेल असे सांगून तिने कुटुंबाला जाळ्यात ओढले. यासाठी तिने ५ लाख रुपयांची मागणी केली, जी तडजोडीअंती ३ लाख रुपयांवर निश्चित झाली.
आरोपी महिलेने वेगवेगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि शासकीय कामासाठी पैसे द्यावे लागतील असे सांगून फिर्यादी व त्यांच्या मामीकडून रोख आणि ऑनलाईन स्वरूपात एकूण ४ लाख रुपये उकळले. त्यानंतर ३ जून रोजी तिने व्हॉट्सॲपवर एक नियुक्ती आदेश पाठवला. या आदेशावर कोणताही अधिकृत शिक्का किंवा लोगो नव्हता, तसेच जॉईनिंगची तारीख रविवारची असल्याने फिर्यादीला संशय आला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीच्या कुटुंबीयांनी काजलला जाब विचारला. सुरुवातीला तिने उडवाउडवीची उत्तरे दिली, परंतु पोलिसात जाण्याची भीती दाखवल्यानंतर तिने घाबरून १ लाख रुपये ऑनलाईन परत केले. उर्वरित रकमेबाबत विचारणा केली असता तिने उद्धटपणे वर्तन केले आणि त्यानंतर ती अचानक घरातून पळून गेली. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलिसांनी काजल देविदास भट्ट हिच्याविरुद्ध बीएनएस कलम ३१८(४) आणि ३१९(२) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस उपनिरीक्षक राजकुमार ससाणे या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.