Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

धानोरा बुद्रुकच्या तत्कालीन ग्रामसेवकास १० हजारांचा दंड

Updated: नोव्हेंबर 21, 2025

By Vivek Sindhu

606c7cc7 4f66 56be 8160

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

माहिती अधिकारातील निष्काळजीपणावर राज्य माहिती आयोगाची कारवाई

अंबाजोगाई : माहिती अधिकारांतर्गत मागितलेली माहिती वेळेत न दिल्याने धानोरा बुद्रुक येथील तत्कालीन जनमाहिती अधिकारी तसेच ग्रामसेवक यांच्यावर राज्य माहिती आयोगाने १० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. प्रदीप हरिचंद्र पाटील यांनी २ जून २०२० रोजी ग्रामपंचायतीकडे विविध कामांची माहिती मागितली होती; मात्र निर्धारित मुदतीत माहिती न मिळाल्याने त्यांनी आयोगाकडे तक्रार दाखल केली.

तक्रारीची छाननी करताना आयोगाने कारणे दाखवा नोटीस जारी केली होती. कलम १९(८)(ग) व २०(१) नुसार ३० दिवसांत खुलासा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. तथापि, तत्कालीन जनमाहिती अधिकारी यांनी कोणताही खुलासा न पाठवल्याने त्यांचे मौन हे निष्काळजीपणाचे व नियमबाह्य वर्तन असल्याचे आयोगाने नमूद केले.

अंतिम निर्णयात संबंधित ग्रामसेवकास दहा हजार रुपयांची शास्ती आकारण्यात आली असून, या रकमेच्या वसुलीची जबाबदारी पंचायत समिती अंबाजोगाईच्या गटविकास अधिकाऱ्यांवर टाकण्यात आली आहे. आयोगाने भविष्यात माहिती अधिकार कायद्याचे काटेकोर पालन करण्याचे स्पष्ट निर्देश सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.


Categories

Recent Posts