Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

बुट्टेनाथ पुलाच्या कामाला अखेर सुरुवात; आ. नमिता मुंदडांच्या पाठपुराव्याला यश

Updated: जानेवारी 22, 2026

By Vivek Sindhu

डोंगरपट्ट्यातील गावांचा पावसाळ्यातील वनवास संपणार

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

डोंगरपट्ट्यातील गावांचा पावसाळ्यातील वनवास संपणार

अंबाजोगाई: अंबाजोगाई जवळील बुट्टेनाथ येथील पुलाच्या कामाला आजपासून प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. मागील अनेक दिवसांपासून प्रशासकीय लाल फितीत अडकलेले हे काम आमदार नमिता मुंदडा यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मार्गी लागले आहे. या पुलाचे काम सुरू झाल्याने आगामी पावसाळ्यात अंबाजोगाई आणि डोंगरपट्ट्यातील संपर्क तुटण्याची भीती आता कायमची मिटणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

बुट्टेनाथ येथील हा पूल अतिशय जुना झाला असून त्याची उंचीही अत्यंत कमी आहे. यामुळे पावसाळ्यात थोडाही मोठा पाऊस झाला की पुलावरून पाणी वाहू लागते आणि वाहतूक पूर्णपणे ठप्प होते. पुलावरून पाणी गेल्यामुळे अंबाजोगाई शहराचा डोंगरपट्ट्यातील येल्डा, कुरणवाडी, चिचखंडी यांसारख्या अनेक गावांसोबतचा संपर्क पूर्णपणे तुटत असे. पावसाळ्यातील या नैसर्गिक अडथळ्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना दवाखान्यात नेणे, शेतकरी, दुग्ध व्यावसायिक किंवा दैनंदिन कामासाठी शहरात येणे ग्रामस्थांसाठी जिकिरीचे बनले होते.

हे काम तांत्रिक कारणास्तव रखडल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. ही गैरसोय दूर करण्यासाठी नमिता मुंदडा यांनी शासनाकडे या पुलाच्या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर प्रशासकीय अडचणी दूर होऊन आज या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आहे. आगामी पावसाळा सुरू होण्यापूर्वी हा पूल पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न असून, यामुळे डोंगरपट्ट्यातील हजारो नागरिकांची अनेक वर्षांची जुनी समस्या आता सुटणार आहे. प्रशासनाने आता हे काम दर्जेदार आणि विहित वेळेत पूर्ण करावे, अशी अपेक्षा या भागातील नागरिक व्यक्त करत आहेत.


Categories

Recent Posts