Breaking
Updated: नोव्हेंबर 9, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकडा : दारिद्र्य, दुष्काळ आणि संघर्ष या शब्दांनी ज्या मुलाचे बालपण वेढले होते, त्याच मुलाने आता भारताचा तिरंगा आंतरराष्ट्रीय मैदानावर फडकवला आहे. आष्टी तालुक्यातील पाटसरा येथील सनी सुभाष फुलमाळी या १७ वर्षीय तरुणाने बहरीन येथे झालेल्या आशियाई युवा कुस्ती स्पर्धेत ६० किलो गटात सुवर्णपदक पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली.
पुण्यातील लोहगाव येथील झोपडीत राहणाऱ्या सनीचा हा प्रवास प्रतिकूलतेवर मात करत केलेल्या संघर्षाचा उत्तम आदर्श ठरला आहे. सनीचे वडील सुभाष फुलमाळी हे नंदीबैल घेऊन भविष्य सांगतात, तर आई सुई-दाभण विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. हलाखीच्या परिस्थितीत जगत असतानाही त्यांनी मुलांच्या शिक्षणात व कुस्तीच्या सरावात कधीही अडथळा आणला नाही.
कुटुंबातच कुस्तीचा वारसा आहे. आजोबा आणि वडिलांना कुस्तीची प्रचंड आवड होती. पण परिस्थितीमुळे स्वप्न अपूर्ण राहिले. मुलांनी तेच स्वप्न पूर्ण करावे म्हणून सुभाष यांनी झोपडीच्या बाहेरच मातीचे कुस्ती मैदान तयार केले. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली सनी, भैय्या आणि बादल या तीन भावांचा सराव सुरू झाला.
सनीच्या जिद्दीने वस्ताद संदीप भोंडवे यांचे लक्ष वेधून घेतले. लोहगाव येथील ‘जाणता राजा’ तालीममध्ये सनीला घेतल्यानंतर भोंडवे यांनी त्याला दत्तक घेतले आणि संपूर्ण खर्च उचलत आठ वर्षे त्याचे प्रशिक्षण दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सनी महाराष्ट्र चॅम्पियनशिपमध्ये विजेता ठरला आणि राष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. अखेर बहरीन येथील आशियाई युवा स्पर्धेत त्याने इराण, इराक, जपान आणि कोरिया या देशांच्या पैलवानांना पराभूत करून सुवर्णपदक मिळवले.
सुवर्णपदकाची बातमी कळताच लोहगाव झोपडपट्टीत जल्लोष उसळला. सनीने जेव्हा आई-वडिलांना विजयाची बातमी दिली, तेव्हा दोघांनाही अश्रू अनावर झाले. त्यांच्या आयुष्यभराच्या कष्टांचे सोनं झालं होतं.
सनी आता पुढचे लक्ष्य ऑलिंपिक पदकाचे ठेवून दररोज दुप्पट मेहनत घेत आहे. “बहरीनमध्ये भारतासाठी सुवर्ण जिंकलं, आता ऑलिंपिकमध्ये तिरंगा फडकवायचा आहे,” असा निर्धार सनीने व्यक्त केला.
त्याच्या या यशाबद्दल आमदार सुरेश धस यांनी अभिनंदन करताना म्हटले की, “सनी फुलमाळीने अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक मिळवून आष्टीचं नाव उज्ज्वल केलं आहे. त्याची जिद्द ग्रामीण तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.”
सनीचा प्रवास दाखवतो की जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शन असेल तर कोणतेही स्वप्न अशक्य नाही. झोपडीतून उठलेला हा मराठमोळा पैलवान आज संपूर्ण मराठवाड्याचा आणि देशाचा अभिमान बनला आहे.