Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

रुपेरी पडद्यावरील ‘सुबोध’ आदर्श: अभिनयाच्या पंचविशीनिमित्त सुबोध भावेंचा ‘मानवलोक’सह २५ संस्थांना मदतीचा हात

Updated: डिसेंबर 30, 2025

By Vivek Sindhu

WhatsApp Image 2025 12 30 at 12.32.01 PM

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई: मराठी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू अभिनेता सुबोध भावे यांनी आपल्या वयाची ५० वर्षे आणि अभिनय कारकिर्दीची २५ वर्षे पूर्ण केल्याच्या निमित्ताने एक स्तुत्य सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे. या विशेष टप्प्याचे औचित्य साधून त्यांनी ग्रामीण भागातील तळागाळातील लोकांसाठी कार्य करणाऱ्या २५ संस्थांना मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला असून, यामध्ये अंबाजोगाई येथील प्रसिद्ध ‘मानवलोक’ संस्थेची निवड करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर नुकतीच लोहिया कुटुंबियांनी सुबोध भावे यांच्या निवासस्थानी त्यांची सदिच्छा भेट घेतली.

​या भेटीदरम्यान सुबोध भावे यांचा कमालीचा साधेपणा आणि माणुसकीचे दर्शन घडले. एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये भेट न ठेवता त्यांनी लोहिया कुटुंबियांना आपल्या घरी आमंत्रित केले होते. अनिकेत लोहिया, कल्पना लोहिया आणि ईशा लोहिया यांचे स्वागत सुबोध भावे यांनी स्वतः दरवाजा उघडून अत्यंत विनयशीलतेने केले. कोणत्याही सेलिब्रिटीचा बडेजाव न मिरवता, घरगुती वातावरणात त्यांनी पाहुण्यांशी संवाद साधला. विशेष म्हणजे, स्वतः चहा तयार करून आणि घरातील साध्या संवादातून त्यांनी औपचारिकतेचे ओझं क्षणात दूर केले.

​गप्पांच्या ओघात सुबोध भावे यांनी आपल्या या सामाजिक कार्यामागची भूमिका स्पष्ट केली. समाजासाठी निस्वार्थपणे काम करणाऱ्या अनेक संस्था प्रसिद्धीपासून दूर राहून मोठे कार्य करत असतात, अशा संस्थांना बळ देणे हे आपले कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले. एका हाताने केलेले दान दुसऱ्या हाताला कळू नये, अशी त्यांची भावना असली तरी, सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा कार्याची ओळख दूरवर पोहोचावी आणि इतर दात्यांनाही दिशा मिळावी, या हेतूने या भेटीचे चित्रीकरण करण्यात आले.

​यावेळी सुबोध भावे यांच्या पत्नी मंजिरी भावे यांचीही उपस्थिती होती. या भेटीत केवळ कामावरच नव्हे, तर वैयक्तिक विषयांवरही मनमोकळ्या गप्पा झाल्या. सुबोध भावे यांची कुलदैवत योगेश्वरी देवी असून, अंबाजोगाईशी असलेल्या या आध्यात्मिक धाग्यामुळे एक वेगळेच ऋणानुबंध यावेळी दिसून आले. या प्रसंगी त्यांनी ‘मानवलोक’ संस्थेसाठीचा मदतीचा धनादेश सुपूर्द केला. भेटीच्या शेवटी त्यांनी आपल्या संग्रहातील शहाजी राजांवरील एक पुस्तक कल्पना लोहिया यांना भेट म्हणून दिले.

​सुबोध भावे यांनी अंबाजोगाई येथे येऊन योगेश्वरी देवीचे दर्शन घेण्याची आणि मानवलोकच्या प्रत्यक्ष कार्याला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मोठ्या पडद्यावरील हा महान कलाकार प्रत्यक्ष आयुष्यात जमिनीवर पाय असलेला एक अत्यंत संवेदनशील माणूस असल्याचे या भेटीतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले. माणुसकीचा धर्म कृतीतून जगणाऱ्या या कलावंताचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.


Categories

Recent Posts