Breaking

अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेणे कायदेशीर गुन्हा, ७ वर्षांच्या शिक्षेची तरतूद

Updated: जून 15, 2026

By Vivek Sindhu

अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेणे कायदेशीर गुन्हा, ७ वर्षांच्या शिक्षेची तरतूद

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषिकेश शिंदे (IPS) यांचा तरुणाईला इशारा

अंबाजोगाई: प्रेम भावनांचा आदर करा, परंतु कायद्याची चौकट ओलांडून अल्पवयीन मुला-मुलींना फूस लावून पळवून नेणे किंवा त्यांच्यासोबत पळून जाणे हा गंभीर कायदेशीर गुन्हा आहे, असा स्पष्ट इशारा बीडच्या अंबाजोगाई येथील उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषिकेश शिंदे (IPS) यांनी दिला आहे. जिल्ह्यातील तरुण पिढीला कायद्याची जाणीव करून देण्यासाठी बीड जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने अंबाजोगाई उपविभागात एक विशेष जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. ‘प्रेम असू दे… पण निर्णय समजदारपणाचा असूदे’ असा महत्त्वपूर्ण संदेश देत पोलिसांनी प्रामुख्याने तरुणाईला सतर्क केले आहे.

देशात लागू झालेल्या नव्या कायद्यानुसार, म्हणजेच भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम १३७(२) अन्वये अल्पवयीन मुलीला फूस लावून, पळवून नेणे किंवा तिच्यासोबत पळून जाणे हा अतिशय गंभीर आणि दंडनीय गुन्हा मानला गेला आहे. या गुन्ह्यासाठी कायद्यात तब्बल ७ वर्षांपर्यंतच्या कडक कारावासाची आणि दंडाची तरतूद करण्यात आली आहे. एका चुकीच्या निर्णयामुळे संपूर्ण आयुष्याची कशी धूळधाण उडू शकते, याकडे पोलिसांनी या मोहिमेच्या माध्यमातून लक्ष वेधले आहे. अशा गुन्ह्यांमध्ये अडकल्यास तरुणांवर पोलीस केस होऊन कायमचा गुन्हेगारी रेकॉर्ड तयार होतो, ज्यामुळे शिक्षण, नोकरी आणि भविष्यातील चांगल्या संधींवर कायमची संक्रांत येते.

या समस्येचे कौटुंबिक आणि मानसिक परिणामही गंभीर आहेत. अशा घटनांमुळे कुटुंबांचा समाजातील मान-सन्मान धुळीस मिळतो, तर दुसरीकडे नात्यांमध्ये कायमची दरी निर्माण होते. कायद्याच्या कचाट्यात सापडल्यानंतर तरुणांना तीव्र मानसिक ताण, नैराश्य आणि पश्चात्तापाचा सामना करावा लागतो, तर दुसरीकडे अल्पवयीन मुलींचे संपूर्ण भविष्य आणि शिक्षण धोक्यात येते.

उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषिकेश शिंदे यांनी तरुणांना आवाहन करताना सांगितले की, वयाच्या या टप्प्यावर भावनांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. शिक्षण, करिअर आणि स्वतःचे ध्येय पूर्ण करण्याला तरुणांनी पहिले प्राधान्य दिले पाहिजे. कोणत्याही प्रकारची समस्या, मानसिक गोंधळ किंवा दडपण असल्यास तरुणांनी तात्काळ आपल्या घरातील विश्वासू व्यक्ती, शिक्षक किंवा थेट पोलिसांशी संपर्क साधून मार्गदर्शन घ्यावे. या प्रक्रियेत पालकांची भूमिका महत्त्वाची असून त्यांनी मुलांशी मैत्रीपूर्ण संवाद ठेवावा. मुलांच्या बदलत्या वागणुकीवर, त्यांच्या ऑनलाईन हालचालींवर आणि मोबाईलच्या वापरावर पालकांनी बारीक पण विश्वासाचे लक्ष ठेवावे, जेणेकरून मुलांचे भविष्य सुरक्षित राहील असे आवाहन शिंदे यांनी नमूद केले आहे.


Categories

Recent Posts