Breaking

पुरुषोत्तमपुरी येथे भाविकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना

Updated: जून 12, 2026

By Vivek Sindhu

पुरुषोत्तमपुरी येथे भाविकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

गोदावरी नदी परिसरात २४ तास शोध व बचाव पथके तैनात

बीड – जिल्ह्यात माजलगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र पुरुषोत्तमपुरी येथे दि. १० जून २०२६ रोजी गोदावरी नदी पात्रात घडलेल्या बोट दुर्घटनेनंतर बीड जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर, भविष्यात अशी कोणतीही जीवितास धोका निर्माण करणारी अनुचित घटना टाळण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने अत्यंत कडक पावले उचलली आहेत. पुरुषोत्तमपुरी आणि गोदावरी नदी परिसरात भाविकांची होणारी अलोट गर्दी आणि संभाव्य धोके लक्षात घेऊन प्रशासनाने १० कलमी नियमावली जारी केली असून, संपूर्ण परिसरात २४ तास शोध व बचाव पथके तैनात करण्याचे आदेश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले आहेत.

        पुरुषोत्तमपुरी येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची सुरक्षा वाऱ्यावर सोडली जाणार नाही, अशी कडक भूमिका प्रशासनाने घेतली आहे. नदीकाठ, घाट परिसर आणि होडी वाहतूक केंद्रांवर चोवीस तास कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि आपत्कालीन मदतीसाठी होमगार्डच्या प्रशिक्षित जवानांना गस्त घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

       केवळ शासकीय यंत्रणाच नव्हे, तर स्थानिक पातळीवरील मनुष्यबळाचाही यासाठी वापर केला जाणार आहे. आपदा मित्र आणि आपदा सखी या स्वयंसेवकांची स्वतंत्र पथके मैदानात उतरवण्यात आली आहेत. नदीकाठावर प्रशिक्षित स्थानिक पोहणाऱ्यांची, जीवरक्षकांची  नियुक्ती करण्यात आली असून, त्यांना आवश्यक साहित्यासह सज्ज राहण्यास सांगितले आहे. याशिवाय सेवाभावी संस्थांचे स्वयंसेवक भाविकांना सुरक्षित मार्गदर्शनासाठी मदत करणार आहेत.

       नदी पात्रात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहून नेणाऱ्या होडी चालकांवर आता प्रशासनाची करडी नजर असणार आहे. सर्व होडी चालकांकडे वैध परवाने असण्याची खात्री केली जाईल. कोणत्याही परिस्थितीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक होणार नाही, याची दक्षता घेण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत.

       सुरक्षेसाठी २४ तास कार्यरत असणारी शोध व बचाव पथके, नदी परिसरात पुरेशा प्रमाणात लाईफ जॅकेट, लाईफ बॉय आणि दोरखंड आपत्कालीन परिस्थितीसाठी बचाव नौका, भाविकांच्या जागरूकतेसाठी नदीकाठी माहिती व सूचना फलक लावण्यात आली आहेत.

       माजलगावचे तहसीलदार, पोलीस निरीक्षक, स्थानिक ग्रामपंचायत आणि वैद्यकीय अधिकारी यांच्यात समन्वय साधून आपत्कालीन प्रतिसाद २४ तास ॲक्टिव्ह मोडवर ठेवण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष विवेक जॉन्सन यांनी सर्व संबंधित विभागांना या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले असून, केलेल्या कारवाईचा अनुपालन अहवाल तातडीने सादर करण्यास सांगितले आहे. आदेशात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाईचे संकेतही जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

*-*-*-*-


Categories

Recent Posts