Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

श्री बडेबाबा विद्यामंदिर शिक्षण संस्थेविरोधात आमरण उपोषण सुरू

Updated: नोव्हेंबर 10, 2025

By Vivek Sindhu

श्री बडेबाबा विद्यामंदिर शिक्षण संस्थेविरोधात आमरण उपोषण सुरू

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज – लव्हुरी (ता. केज) येथील श्री बडेबाबा विद्यामंदिर या शिक्षण संस्थेतील शिक्षकांची पाच रिक्त पदे गेल्या आठ वर्षांपासून न भरल्याने विद्यार्थ्यांच्या नुकसानीस जबाबदार धरून संस्थेवर कार्यवाही करण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठाणचे संदीप चाळक व इतर लोकांनी शाळेसमोर सोमवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे.
लव्हुरी येथील श्री बडेबाबा विद्यामंदीर शाळेतील शिक्षकांची पाच रिक्त पदे न भरल्याने विद्यार्थ्यांची गुणवत्ता ढासळली असून शिक्षकांची व विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात यावी. याबाबत ग्रामसभेने सुद्धा ठराव घेतला असून श्री. बडेबाबा शिक्षण प्रसारक मंडळाने जागेचे बनावट व खोटे कागदपत्रे बनवून शासनाची फसवणूक केलेली आहे. त्यांची चौकशी करून संबधीत दोषींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा. शाळेच्या जागेचे शासनाकडून भाडे घेण्यात येत असताना जागेच्या मालक म्हणून मंगलबाई संपत खांडेकर यांनी पिक विमा योजनेचा लाभ घेत शासनाची दुहेरी फसवणुक केली आहे. त्याची सखोल चौकशी करुन दोषींवर कार्यवाही करावी. शाळेच्या इमारतीचे नियमाप्रमाणे शासनाकडून नियमितपणे भाडे मिळत असताना इमारत ही अत्यंत जीर्ण झाली असून भिंतीस भेगा पडल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका होऊ शकतो. यामुळे या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे. इमारत धोकेदायक असल्याने शाळा दुसऱ्या जागेत स्थलांतरीत करण्यात यावी. सन २०१८ पासुन मागासवर्गीय शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना देण्यात आलेली नाही. त्यामुळे दोषीवर कार्यवाही करून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप करण्यात यावी. नारदस्वामी विद्यामंदीर, बीड येथे कार्यरत असलेले सेवक श्री. गणेश बजरंग इतापे यांना सेवा जेष्ठतेनुसार लिपीक पदावर नियुक्ती देणे आवश्यक असताना श्रीमती तनुजा दाबेकर यांची बेकायदेशीर केलेली नियुक्ती रद्द करण्यात यावी. या मागण्यासाठी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठाण
संस्थापक अध्यक्ष बाळराजे आवारे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप चाळक व इतर लोकांनी सोमवारी बडेबाबा विद्यामंदिर या शाळेसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.


Categories

Recent Posts