Breaking
Updated: जून 10, 2026
जुन्या भांडणाच्या कुरापतीतून घरात घुसून लोखंडी गजाने प्राणघातक हल्ला; तळेगाव घाट येथील घटना
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई: तालुक्यातील तळेगाव घाट येथे जुन्या भांडणाची कुरापत काढून एका ५५ वर्षीय शेतकऱ्याच्या घरात बेकायदेशीरपणे प्रवेश करत लोखंडी गजाने आणि काठीने प्राणघातक हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या भीषण हल्यात शेतकऱ्याच्या डाव्या हाताचे मनगट फॅक्चर झाले असून ते गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी बर्दापूर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तळेगाव घाट येथील रहिवासी असलेले बाळासाहेब जगन्नाथ मुरमुडे हे सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास आपल्या घरात बसले होते. दरम्यान, जुन्या वादाचा राग मनात धरून आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून त्यांच्या घरात अनाधिकृत प्रवेश केला. आरोपींनी सुरुवातीला बाळासाहेब यांना अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपी आदित्य माले, ओम माले आणि सुदर्शन वांगे यांनी लोखंडी गजाने बाळासाहेब यांच्या पाठीवर, गुडघ्यावर आणि डाव्या हाताच्या मनगटावर बेदम मारहाण केली. या हल्ल्यात त्यांच्या मनगटाचे हाड फॅक्चर झाले. तर इतर आरोपी लक्ष्मण वांगे आणि कौशल्या वांगे यांनी काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून मुकामार दिला. या गंभीर घटनेनंतर बाळासाहेब मुरमुडे यांनी पोलिसात धाव घेतली असून पोलीस हवालदार भाजीभाकरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.