Breaking
Updated: June 28, 2025
WhatsApp Group
Join Nowआ. नमिता मुंदडा यांच्या प्रयत्नांना यश; विद्यार्थ्यांना मिळणार आधुनिक वसतिगृह सुविधा
अंबाजोगाई – स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या वसतिगृहांच्या नुतनीकरणासाठी महाराष्ट्र शासनाने एकूण ७ कोटी ७७ लाख रुपयांचा मोठा निधी मंजूर केला आहे. केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला हे फलित लाभले असून, त्यांच्या प्रभावी नेतृत्वामुळे अंबाजोगाईच्या वैद्यकीय शिक्षण क्षेत्राला नवे बळ मिळाले आहे.
शासन निर्णयानुसार महाविद्यालयाच्या परिसरातील तीन वसतिगृहांचे नुतनीकरण केले जाणार आहे. यामध्ये नवीन पी.जी. डॉक्टर वसतिगृह, ८० विद्यार्थ्यांचे जुने वसतिगृह (इंटर्न्स हॉस्टेल) आणि मुलींचे वसतिगृह क्रमांक १ यांचा समावेश आहे. यामध्ये नवीन पी.जी. वसतिगृहासाठी ३.१७ कोटी, जुन्या पी.जी. वसतिगृहासाठी (इंटर्न्स हॉस्टेल) २.१२ कोटी आणि मुलींचे वसतिगृह क्रमांक १ साठी २.४६ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
नुतनीकरणाची कामे पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना अधिक सुसज्ज, सुरक्षित आणि सुविधा युक्त निवास व्यवस्था उपलब्ध होणार आहे. वैद्यकीय सेवा आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या भांडवली खर्चाच्या अंतर्गत या कामांसाठी निधी मंजूर करण्यात आला असून, शासनाने तांत्रिक व प्रशासकीय अटींचे पालन करत काम सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयाबद्दल आ. नमिता मुंदडा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, मंत्री पंकजाताई मुंडे यांचे आभार मानले आहेत.
आ. नमिता मुंदडा यांचा महत्त्वपूर्ण वाटा
केवळ निधी मंजूर करून घेणे नव्हे तर ही संपूर्ण प्रक्रिया मार्गी लागण्यासाठी आमदार नमिता मुंदडा यांनी संबंधित विभागांसोबत नियमित संपर्क ठेवून पाठपुरावा केला. विद्यार्थ्यांना अत्यावश्यक सुविधा मिळाव्यात, त्यांच्या राहणीमानात सुधारणा व्हावी आणि ग्रामीण भागात असलेल्या स्वाराती महाविद्यालयाची आधुनिकतेच्या दिशेने वाटचाल व्हावी या दृष्टिकोनातून त्यांनी या कामाला प्राधान्य दिले. या विकास प्रकल्पामुळे ‘स्वाराती’मधील वैद्यकीय विद्यार्थ्यांना आधुनिक जीवनशैलीशी सुसंगत असलेल्या सुविधा लाभणार आहेत.