Breaking

कौटुंबिक वादातून नागपिंपरीत सासरा-जावयामध्ये तुंबळ हाणामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल

Updated: एप्रिल 29, 2026

By Vivek Sindhu

परस्परविरोधी गुन्हे दाखल

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई: कौटुंबिक वादातून सासरा आणि जावई यांच्यात झालेल्या हिंसक हाणामारीने परळी तालुक्यातील नागपिंप्री गाव हादरले आहे. नोकरीसाठी पैशांची मागणी आणि छळाच्या कारणावरून झालेल्या या वादात दोन्ही बाजूंनी कोयता आणि कुऱ्हाडीचा वापर करण्यात आला असून यात अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

पहिली फिर्याद अरुण परमेश्वर गीत्ते (वय ४५, रा. वाका) यांनी दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, मुलगी वैष्णवी हिला तिचा पती लहूदास रामभाऊ मूंडे (वय ३२) हा नोकरीसाठी पैसे भरण्यासाठी वारंवार पैशांची मागणी करून त्रास देत होता. २७ एप्रिल रोजी मुलीने फोन करून पती मारहाण करत असल्याचे सांगितल्याने अरुण गीत्ते हे तिला आणण्यासाठी नागपिंप्री येथे गेले. त्यावेळी जावई लहूदास याने जमिनीवर पडलेला कोयता घेऊन अरुण यांच्या डाव्या हातावर आणि मनगटावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले, ज्यात त्यांचा हात फॅक्चर झाला आहे. या प्रकरणी लहूदास रामभाऊ मूंडे, रामभाऊ प्रभाकर मूंडे आणि शितल रामभाऊ मूंडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरीकडे, जावई लहूदास रामभाऊ मुंडे यांनी प्रति-तक्रार दिली आहे. त्यांच्या दाव्यानुसार, सासरे अरुण गीत्ते आणि इतर सहा जण बेकायदेशीर मंडळी जमवून हातात काठ्या आणि कुऱ्हाडी घेऊन त्यांच्या घरी आले. ‘तू वैष्णवीला का त्रास देतोस’ असे म्हणून त्यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी अरुण गीत्ते यांनी कुऱ्हाडीच्या तुब्याने लहूदास यांच्या डोक्यात मारून जखमी केले, तर एकनाथ गीत्ते आणि इतरांनी लहूदासची बहीण शितल आणि आई शशिकलाबाई यांना काठीने मारहाण केली. यामध्ये शितल हिच्या कपाळाला गंभीर दुखापत होऊन फॅक्चर झाले असून तिच्यावर अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या तक्रारीवरून अरुण गीत्ते, परमेश्वर गीत्ते, बंकटराव गीत्ते, न्यानदेव कुंटे, सौदागर गीत्ते, एकनाथ गीत्ते आणि वैष्णवी मुंडे यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या दोन्ही गुन्ह्यांचा पुढील तपास पोलीस हवालदार बळीराम बसर हे करत आहेत. पोलीस निरीक्षक मुरलीधर खोकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.


Categories

Recent Posts