Breaking
Updated: डिसेंबर 25, 2025
अंबाजोगाईच्या शिरपेचात मानाचा तुरा; शरद सूर्यवंशी यांना 'सुपर रँडोनिअर' बहुमान
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई (प्रतिनिधी): सायकलिंग क्षेत्रात अत्यंत कठीण आणि प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘सुपर रँडोनिअर’ हा बहुमान अंबाजोगाईचे सुपुत्र आणि सायकलपटू शरद सूर्यवंशी यांना प्राप्त झाला आहे. त्यांच्या या उत्तुंग यशामुळे अंबाजोगाईसह संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
जळगाव येथे दि. 20 व 21 डिसेंबर रोजी पार पडलेल्या सायकलिंग स्पर्धेत शरद सूर्यवंशी यांनी सहभाग घेतला होता. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती, हवामानातील बदल आणि शारीरिक क्षमतेची कसोटी पाहणाऱ्या या स्पर्धेत त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. नियमाप्रमाणे निश्चित वेळेत ठराविक अंतर पार करून त्यांनी हे यश संपादन केले आहे. त्यांच्या या खडतर प्रवासात आणि यशात त्यांच्या सहकाऱ्यांचे मोलाचे प्रोत्साहन लाभले आहे. शरद सूर्यवंशी यांच्या या यशाबद्दल त्यांचे मित्रमंडळ, क्रीडा प्रेमी आणि अंबाजोगाईकर नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. अंबाजोगाईचे सायकलिस्ट संतोष कदम, प्रदीप तरकसे, सदानंद वालेकर, बालासाहेब लाखे, मनोज देशमुख, रत्नाकर निकम व निलेश देशमुख यांच्यासह अनेक मित्रपरिवाराने शरद सूर्यवंशी यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. अंबाजोगाई सारख्या ग्रामीण भागातून जिद्दीच्या जोरावर सायकलिंगमध्ये जागतिक स्तराचा मान मिळवल्यामुळे शरद सूर्यवंशी हे तरुण सायकलपटूंसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत.
काय आहे 'सुपर रँडोनिअर' बहुमान?
सायकलिंग क्षेत्रात एकाच वर्षात २००, ३००, ४०० आणि ६०० किलोमीटरच्या चार ‘ब्रॅव्हेट्स’ सायकल राईड्स विहित वेळेत पूर्ण करणाऱ्या सायकलपटूला ‘सुपर रँडोनिअर’ ही पदवी देऊन गौरवण्यात येते. ही कामगिरी करणे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक असते.