Breaking
Updated: नोव्हेंबर 17, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई : नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशनाचा शेवटचा दिवस ठरलेल्या सोमवार, १७ नोव्हेंबर रोजी लोकविकास महाआघाडीने शहरात भव्य शक्तिप्रदर्शन करत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजकिशोर मोदी आणि पंधरा प्रभागांतील ३१ उमेदवारांचे अर्ज दाखल केले. मागील नऊ वर्षांपासून निवडणूक न झाल्याने नगर परिषद प्रशासकांकडे होती. नुकत्याच जाहीर झालेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार आज अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस होता.
राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि समविचारी पक्षांनी एकत्र येत लोकविकास महाआघाडीची निर्मिती केली आहे. या आघाडीने नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी राजकिशोर मोदी यांच्यावर विश्वास ठेवत ३१ उमेदवारांची यादी अंतिम केली. या सर्व उमेदवारांनी आज एकत्रितपणे नामनिर्देशन सादर केले. अर्ज दाखल करण्यासाठी काढण्यात आलेल्या महारॅलीने अंबाजोगाई शहराचे वातावरण ढवळून निघाले. हजारोंचा जनसमुदाय रॅलीत सहभागी झाला. रॅलीत नवयुवक, महिला, ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. रॅलीची सुरुवात जोधाप्रसादजी मोदी विद्यालय परिसरातून झाली. रस्त्यांवरून जाताना जनतेने मोदी आणि उमेदवारांचे स्वागत करत घोषणाबाजी केली. रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक, सदर बाजार, मोची गल्ली, गांधी नगर, मंडी बाजार, पाटील चौक, मंगळवार पेठ, वीर सावरकर चौक, बस स्थानक मार्गे नगर परिषद कार्यालयात पोहोचली. तेथे सर्व उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. या वेळी पृथ्वीराज साठे, बबनराव लोमटे, नरेंद्र काळे, महेंद्र निकाळजे, दीपक कांबळे, हाजी महमूद, खालेद चाऊस यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, या शक्ती प्रदर्शनातून राजकिशोर मोदी यांच्या नेतृत्वावर अंबाजोगाईकरांचा ठाम विश्वास कायम असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. रॅलीतील गर्दी पाहता आगामी निवडणुकीत आघाडीला मिळणाऱ्या प्रतिसादाची झलक दिसत असल्याचे मत व्यक्त होत आहे. रॅलीतील एक खास वैशिष्ट्य म्हणजे या संपूर्ण जनसमुदायात ग्रामीण भागातील एकही व्यक्ती नव्हती. केवळ शहरातील नागरिकांनीच इतक्या मोठ्या संख्येने सहभाग नोंदविल्यामुळे महाआघाडीचा प्रभाव शहरात अधिक वाढल्याचे जाणवत होते. मात्र कोणतेही विशेष नियोजन, प्रचार, वाहतूक व्यवस्था न करता इतकी मोठी गर्दी आपोआप जमली, हे महत्त्वाचे ठरले. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राजकिशोर मोदी आणि सहकारी उमेदवारांनी शहरात नवनवीन विकास संकल्पना राबवण्याचा संकल्प व्यक्त केला. स्वच्छता, रस्ते, पाणीपुरवठा, पायाभूत सुविधा, वाहतूक नियोजन आणि नागरिकाभिमुख प्रशासनासाठी ते प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वच उमेदवारांनी पारदर्शकतेवर आधारित विकासाची हमी दिली आहे.