Breaking
Updated: नोव्हेंबर 18, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई : नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्र. १० नागरिक मागास प्रवर्ग महिला प्रवर्गातून रचना परदेशी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या नामनिर्देशनाच्या शेवटच्या दिवशी शहर परिवर्तन जनविकास आघाडीकडून त्यांनी अर्ज दाखल केला.
केज विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आ. नमिता मुंदडा, जेष्ठनेते तथा अंबाजोगाई नगर परिषद निवडणूक नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नंदकिशोर मुंदडा, युवानेते अक्षय मुंदडा यांनी आधुनिक विकासाचे व्हिजन असलेल्या तरुणाईला प्राधान्य देत रचना परदेशी यांची उमेदवारी निश्चित केली. गुरुवार पेठ प्रभागातून रचना परदेशी यांच्या उमेदवारीमुळे स्थानिक राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे. त्या जेष्ठनेते किशोरकुमार परदेशी यांच्या कन्या असून परदेशी परिवाराचा राजकीय वारसा पुढे नेत त्या निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत.
रचना परदेशी या उच्चशिक्षित असून पुणे विद्यापीठाच्या संरक्षणशास्त्र विभागात पीएचडी करत आहेत. पुण्यात वास्तव्यास असल्याने आधुनिक शहरी विकासाचा अनुभव आणि अंबाजोगाई शहरातील मूलभूत समस्या यांची त्यांना स्पष्ट जाणीव आहे. शहरातील विकासकामांच्या गरजा, प्रभागातील अडचणी आणि नागरिकांच्या अपेक्षा याबाबत त्यांनी अभ्यास केला आहे. प्रभावी वक्तृत्वशैलीमुळे त्यांची स्वतंत्र ओळख आहे.
महिलांच्या प्रश्नांवर ठोस आवाज उठवणे, पारदर्शक प्रशासन, महिलांसाठी स्वतंत्र निधी, युवक-युवतींसाठी कौशल्य केंद्र, लघुउद्योजकांसाठी मदत, पाणीपुरवठा प्रश्नाच्या सोडवणुकीला प्राधान्य, स्वच्छता आणि वाहतूक नियोजन, दर्जेदार पायाभूत सुविधा, रस्ते व नाली प्रकल्पांना गती देणे आणि सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण प्रभागात सीसीटीव्ही बसवणे ही आपली प्राथमिकता असल्याचे रचना परदेशी यांनी स्पष्ट केले. शिक्षण आणि सामाजिक जाण नागरिकांच्या कामी यावी यासाठी सातत्याने प्रयत्न करणार असल्याचीही त्यांनी भूमिका मांडली.