Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

परळी बसस्थानकात चोऱ्या करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Updated: नोव्हेंबर 13, 2025

By Vivek Sindhu

परळी बसस्थानकात चोऱ्या करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

परळी बस स्थानकावर गर्दीचा गैरफायदा घेऊन दागिने चोरी करणाऱ्या टोळीचा संभाजीनगर आणि परळी पोलिसांनी पर्दाफाश केला असून आरोपींकडून एकूण 6 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी नरसिंग कोंडीबा बंन याला अटक करण्यात आली असून दोन महिला साथीदारांचीही गुंतवणूक उघड झाली आहे.

फिर्यादी प्रतीक विलास वाघमारे, रा. अंकुश नगर, बीड यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले की, त्यांची आई सुनिता वाघमारे 4 नोव्हेंबर 2025 रोजी नांदेडवरून बीडकडे प्रवास करत असताना परळी बसस्थानकात बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत अनोळखी आरोपीने तिच्या गळ्यातील 13 ग्रॅम वजनाचे, 1 लाख 45 हजार रुपये किंमतीचे मिनी गंठण चोरले. या प्रकरणी संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 230/2025 अंतर्गत कलम 303(2) बीएनएसप्रमाणे गुन्हा नोंद झाला.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठांनी तपासाला गती देण्याच्या सूचना केल्या. तपास अधिकारी पोह/416 साजिद पठाण यांनी परळी बसस्थानक आणि शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपी ऑटोने निघाल्याचे, तसेच पुढे शहराबाहेरील ठिकाणी उभ्या असलेल्या स्विफ्ट डिझायर कारमधून पळून गेल्याचे आढळले. वाहन क्रमांकाचा मागोवा घेत तांत्रिक तपासातून नरसिंग कोंडीबा बंन (वय 38, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) व त्याच्या दोन महिला साथीदारांनी चोरी केल्याचे स्पष्ट झाले.

पोलिसांनी नरसिंगला अटक करून त्याच्याकडून चोरीस गेलेले 13 ग्रॅमचे सोन्याचे मिनी गंठण आणि गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट डिझायर कार (मूल्य अंदाजे 5 लाख रुपये) असा एकूण 6 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे, पोलीस उपनिरीक्षक अनिल शिंदे, संदीप चव्हाण, पोह/416 साजिद पठाण, पोशि/1721 शंकर डोंगळे, पोशि/2098 व्यंकट डोरणाळे, पोशि/710 भगवान चव्हाण यांच्या पथकाने केली.


Related Posts :

Categories

Recent Posts