Breaking
Updated: एप्रिल 23, 2026
दिंड्यांना अधिकृत निमंत्रण प्रदान
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई शहराच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचा मानबिंदू असलेल्या भव्य अश्व रिंगण सोहळ्यासाठी २०२६ या वर्षाचे अधिकृत निमंत्रण देण्यास प्रशासकीय स्तरावर सुरुवात झाली आहे. या सोहळ्याचे स्वागताध्यक्ष तथा अंबाजोगाईचे नवनियुक्त नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली संयोजन समितीने संतश्रेष्ठ नामदेव महाराज संस्थान, नरसी नामदेव आणि संतश्रेष्ठ जनाबाई संस्थान, गंगाखेड येथे जाऊन अधिकृत निमंत्रण पत्रिका सुपूर्द केल्या. मराठवाड्यातील हा पहिला आणि भव्य रिंगण सोहळा असून, यंदा तो अभूतपूर्व उत्साहात साजरा करण्यासाठी संयोजन समितीने कंबर कसली आहे.
या सोहळ्याचे नियोजन करण्यासाठी संयोजन समितीचे सचिव तालमार्तंड प्रकाश बोरगावकर यांनी नरसी नामदेव येथे विश्वस्तांची भेट घेऊन निमंत्रण दिले. या महत्त्वपूर्ण प्रसंगी माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, दिंडी चालक भागवतराव पाटील, हरिभक्त परायण मगर महाराज, शशिकांत गायकवाड आणि अजय राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच गंगाखेड येथे संतश्रेष्ठ जनाबाई संस्थानचे दिंडी प्रमुख हरिभक्त परायण शिवाजी महाराज चौधरी यांच्याकडेही अधिकृत निमंत्रण सोपवण्यात आले. गेल्या १४ वर्षांपासून सुरू असलेल्या या सोहळ्याने संपूर्ण मराठवाड्यात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली असून, अंबाजोगाईसह पंचक्रोशीतील हजारो भाविक या नयनरम्य दृश्याचे साक्षीदार होण्यासाठी दरवर्षी गर्दी करतात.
केवळ भक्तीचा सोहळा म्हणूनच नव्हे, तर युवा पिढीवर वारकरी संप्रदायाचे आणि संतांच्या विचारांचे संस्कार व्हावेत, यासाठी या सोहळ्यात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात. शालेय विद्यार्थ्यांसाठी समूह दिंडी नृत्य स्पर्धेचे आयोजन हे या सोहळ्याचे मुख्य आकर्षण असते. यामध्ये हजारो बालके विविध संतांच्या भूमिकेत आपले सादरीकरण करतात, ज्यामुळे सामाजिक स्तरावर वारकरी संस्कृतीचे जतन होण्यास मदत होते.
यंदाचा हा सोहळा न भूतो न भविष्यती अशा स्वरूपात संपन्न करण्यासाठी शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर सक्रीय झाले आहेत. हरिभक्त परायण बाबा महाराज जवळगावकर, दिलीप दादा सांगळे, माजी नगराध्यक्ष महादू मस्के, मारुतीराव रेड्डी, दिलीप गीते, बळीराम चोपणे, अनंत आरसुडे, प्रसिद्धी प्रमुख अभिजीत गाठाळ, अविनाश मुडेगावकर यांच्यासह अनेक पदाधिकारी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. अंबा नगरीतील हा सोहळा केवळ एक धार्मिक कार्यक्रम न राहता तो एक व्यापक सामाजिक उत्सव बनला असल्याची माहिती संयोजन समितीचे सचिव प्रकाश बोरगावकर यांनी दिली आहे.