Breaking

मुलीशी बोलत असल्याच्या कारणावरून वाद; महिलेवर लोखंडी गजाने जीवघेणा हल्ला

Updated: जून 16, 2026

By Vivek Sindhu

मुलीशी बोलत असल्याच्या कारणावरून वाद; महिलेवर लोखंडी गजाने जीवघेणा हल्ला

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

गेवराई: तालुक्यातील शेकटा येथे आपल्याच मुलीशी बोलत उभ्या असलेल्या एका महिलेवर ‘आमच्याकडे बघून मोठ्याने का बोलतेस’ असा जाब विचारत लोखंडी गजाने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ११ जून २०२६ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास फिर्यादीच्या घरासमोर हा प्रकार घडला असून, याप्रकरणी १५ जून रोजी चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशाबाई सखाराम कांबळे या ४२ वर्षीय महिला शेतकऱ्याने या हल्ल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध तक्रार दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशाबाई या आपल्या घरासमोर मुलीशी बोलत असताना, गावातीलच भागवत शेषेराव कांबळे आणि प्रियंका भागवत कांबळे तेथे आले. त्यांनी विनाकारण वादावादी उकरून काढत आशाबाईंना मारहाण सुरू केली. यावेळी आरोपी भागवत कांबळे याने हातातील लोखंडी गजाने आशाबाईंच्या डोक्यात प्रहार करून त्यांचे डोके फोडले. तसेच प्रियंका कांबळे, रोहिनी कांबळे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील मुंगी येथील तात्यासाहेब उत्तम वालेकर यांनी संगनमत करून आशाबाई आणि त्यांच्या नातेवाईकांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. आरोपींनी दोघींना अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. जखमींवर उपचार सुरू असल्याने फिर्याद देण्यास उशीर झाला. चकलांबा पोलिसांनी भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार प्रधान पुढील तपास करत आहेत.


Categories

Recent Posts