Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

अंबाजोगाईतील नवीन रस्त्यांवर ‘अदृश्य’ गतिरोधकांचा सापळा

Updated: डिसेंबर 15, 2025

By Vivek Sindhu

595117589 25413687294987314 3190504381535191241 n

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे वाहनधारकांचा जीव धोक्यात

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहराचा चेहरामोहरा बदलत असून, शहरातील मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्ते प्रशस्त आणि चकाचक झाले आहेत. विशेषतः शंभर फुटांच्या झालेल्या मुख्य रस्त्यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडली असून वाहनांचा वेगही वाढला आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने या सुसाट वेगाला लगाम घालण्यासाठी उभारलेले गतिरोधक आता वाहनधारकांसाठी जीवघेणे ठरत आहेत. कोणत्याही सूचना फलकाविना आणि पांढऱ्या पट्ट्यांविना अचानक उभारण्यात आलेले हे गतिरोधक ‘अदृश्य’ असल्यासारखे भासत असून अपघातांना खुले आमंत्रण देत आहेत.

शहरातील रस्त्यांचे रुंदीकरण झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून काही ठिकाणी गतिरोधक टाकले आहेत. परंतु, हे गतिरोधक तयार करताना सर्व नियम धाब्यावर बसवल्याचे चित्र आहे. गतिरोधकांवर आवश्यक असलेले पांढरे पट्टे किंवा रिफ्लेक्टर्स लावण्यात आलेले नाहीत. तसेच गतिरोधक असल्या दर्शवणारे सूचना फलकही रस्त्याच्या कडेला लावलेले नाहीत. त्यामुळे दिवसा आणि विशेषतः रात्रीच्या वेळी हे गतिरोधक वाहन चालकांच्या लक्षात येत नाहीत.

परिणामी, भरधाव वेगातील वाहने अचानक आलेल्या गतिरोधकावर जोरात आदळत आहेत. यामुळे वाहनांचे नुकसान होत असून दुचाकीस्वार तोल जाऊन खाली पडण्याचे प्रकार नित्याचे झाले आहेत. गेल्या काही दिवसांत अनेक दुचाकीस्वार पडून जखमी झाले असून, काहीजण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. सुदैवाने आतापर्यंत यात कोणाचाही नाहक बळी गेला नाही, मात्र अपघातांची मालिका सुरूच आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग एखाद्याचा जीव जाण्याची वाट पाहत आहे का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वीच प्रशासनाने जागे होणे गरजेचे आहे. या धोकादायक गतिरोधकांवर तात्काळ पांढरे पट्टे मारावेत आणि वाहनधारकांना लांबूनच दिसतील असे सूचना फलक लावावेत, अशी मागणी अंबाजोगाईतील नागरिक आणि वाहनधारकांकडून जोर धरू लागली आहे.


Categories

Recent Posts