Breaking
Updated: डिसेंबर 15, 2025
हरभरा पिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव; पिकाला फटका
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई (प्रतिनिधी) -सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. तसेच रात्र मोठी असल्यामुळे घाटेअळीचे पतंग मोठया प्रमाणावर अंडी घालतात. या सर्व बाबी घाटेअळीच्या प्रादुर्भावासाठी पोषक असल्यामुळे घाटेअळीचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात होऊ शकतो. बऱ्याच ठिकाणी घाटेअळीचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाटेअळी व्यवस्थापन करावे, असे आवाहन कृषी विभागाचे तंत्रज्ञान समन्वयक शिवप्रसाद येळकर यांनी केले आहे.
चांगल्या पावसामुळे यंदा हरभऱ्याच्या क्षेत्रात वाढ झालेली आहे. मात्र, यावर आता घाटेअळीचा प्रादुर्भाव सुरु झाला आहे. ही कीड बहुभक्षी असून विशेषतः पीक फुलोरा आणि प्रामुख्याने घाटे अवस्थेत नुकसानकारक असते. लहान अळ्या सुरुवातीला कोवळी पाने, कळ्या व फुले कुरतडून खातात. घाटे लागल्यानंतर अळ्या घाटे कुरतडून त्यास छिद्र पाडुन डोके आत खुपसून आतील दाणे खातात. साधारणतः एक अळी तीस ते चाळीस घाटयांचे नुकसान करु शकते. सध्या आढळणारी कीड ही अंडी अवस्था
व प्रथम अवस्थेतील अळी अवस्था असल्यामुळे वेळीच उपाय योजना केल्यास कमी खर्चात किडींचे प्रभावी व्यवस्थापन होऊ शकते.मिडिया, यु ट्युब माध्यमातून कृषी विभागाने आवाहन केले आहे. घाटेअळी व्यवस्थापनासाठी कोळपणी किंवा निंदणी करुन पीक तणविरहित ठेवावे. घाटेअळीच्या मोठ्या अळ्या हाताने वेचून नष्ट कराव्यात. घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी ५ कामगंध सापळे प्रति हेक्टरी जमिनीपासून १ मीटर उंचीवर लावावेत. कामगंध सापळयामध्ये ८ ते १० पतंग प्रति सापळा सतत २ ते ३ दिवस आढळल्यास किडनाशकाची फवारणी करावी. शेतामध्ये पक्षी बसण्यासाठी पिकाच्या किमान एक ते दोन फूट उंचीवर पक्षी थांबे हेक्टरी ५० ते ६० ठिकाणी उभारावेत. यामुळे पक्ष्यांना अळ्यांचे भक्षण करणे सोपे जाईल.
सुरक्षा साधने वापरा
शेतात कीडनाशकाचे द्रावण तयार करताना व फवारणी करताना चष्मा, हातमोजे व तोंडावर मास्कचा व सुरक्षा किटचा वापर करावा. शेतकऱ्यांनी फवारणी करताना योग्य ती काळजी घ्यावी म्हणजे किटकनाशकचा शरीरावर प्रादुर्भाव होणार नाही.लहान अवस्थेत असताना हे करा पिकाच्या सुरुवातीच्या काळात ५ टक्के निंबोळी अकांची किंवा अझाडिरॅक्टिन ३०० पीपीम ५ मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून प्रतिबंधात्मक फवारणी करावी. घाटेअळी लहान अवस्थेत असताना एचएएनपीव्ही (५०० एल ई) १ मिली प्रति लिटर पाण्यात ५ ग्रॅम निळ टाकुन सायंकाळी फवारणी करावी.
अधिक प्रादुर्भाव झाल्यास हे उपाय
किडींचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वर आढळून आल्यास इमामेक्टीन बेन्झोएट (५ एसजी) ४.४ ग्रॅम किंवा फ्ल्युबेन्डामाईड (३९.३५ एससी) २ मिली किंवा क्लोरअॅन्ट्रानीलीप्रोल (१८.५ एससी) २.५ मिली यापैकी एका कीडनाशकाची प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कीडनाशकाचे प्रमाण नॅपसॅक पंपासाठी असून पेट्रोल पंपासाठी मात्रा तीनपट वापरावी. असेही शेतकऱ्यांना सुचविले आहे.