Breaking

अंबाजोगाईचे सुपुत्र सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती सुधाकर कुर्डूकर यांचे निधन

Updated: मार्च 21, 2026

By Vivek Sindhu

अंबाजोगाईचे सुपुत्र सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती सुधाकर कुर्डूकर यांचे निधन

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

​अंबाजोगाई: अंबाजोगाईचे सुपुत्र आणि भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती सुधाकर पंडितराव कुर्डूकर यांचे शनिवार, २१ मार्च २०२६ रोजी मुंबई येथे वयाच्या ९१ व्या वर्षी दुःखद निधन झाले. प्रदीर्घ न्यायिक कारकीर्द लाभलेल्या न्यायमूर्ती कुर्डूकर यांनी आपल्या कायदेविषयक ज्ञानाने आणि निस्पृह सेवेने भारतीय न्यायव्यवस्थेत मोलाचे योगदान दिले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विधी क्षेत्रासह त्यांच्या मूळ गावी अंबाजोगाईत शोककळा पसरली आहे. मुंबईतील गिरगाव येथील चंदनवाडी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

​न्यायमूर्ती सुधाकर कुर्डूकर यांचा जन्म आणि प्राथमिक वास्तव्य अंबाजोगाईतील देशपांडे गल्लीत झाले होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक महत्त्वपूर्ण पदे भूषवली. मार्च १९९६ ते जानेवारी २००० या काळात त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कार्य केले. त्यापूर्वी जानेवारी १९९४ ते मार्च १९९६ दरम्यान त्यांनी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून जबाबदारी सांभाळली होती. तसेच १९७८ ते १९९४ या प्रदीर्घ काळात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून न्यायदानाचे कार्य केले. विशेष म्हणजे, जुलै ते सप्टेंबर १९९४ या कालावधीत त्यांनी पंजाबचे प्रभारी राज्यपाल म्हणूनही कार्यभार पाहिला होता.

​केवळ न्यायव्यवस्थाच नव्हे, तर सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचा सक्रिय सहभाग होता. अंबाजोगाई येथील नामांकित योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले होते. निवृत्तीनंतरही कायद्याप्रती असलेली त्यांची निष्ठा कायम होती आणि त्यांनी अखेरच्या टप्प्यापर्यंत आपले योगदान सुरू ठेवले होते. त्यांच्या निधनाने देशाने एक अभ्यासू, अनुभवी आणि निष्कलंक चारित्र्याचा कायदेतज्ज्ञ गमावला असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.


Related Posts :

Categories

Recent Posts